पीडीओ, ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्यांची पाहणी-उपाययोजनांचे आश्वासन
वार्ताहर/येळ्ळूर
मारुती गल्ली, तानाजी गल्ली, विराट गल्ली, हनुमाननगर, चांगळेश्वरनगर या भागातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी नेहमीच आटापिटा करावा लागतो. सुरळीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्राम पंचायतीकडे पाठपुरावाही केला होता. पण त्याकडे तेवढ्या गांभीर्याने प्रभागातील सदस्यांसह अध्यक्ष व पीडीओ यांनी पाहिले नाही. त्यामुळे महिलांनी एक दोनवेळा प्रत्यक्ष भेटून याबाबत माहिती दिली होती. पण कार्यवाही काहीच न झाल्याने मागील आठवड्यात मोर्चाही काढला होता. मागील आठ दिवसांपासून या भागात पाण्याचा पुरवठाच बंद झाल्याने महिलावर्ग आक्रमक होऊन मोर्चा काढण्याच्या तयारीत असताना समस्या समजून घेण्यासाठी पीडीओ पूनम गडगे, अध्यक्ष लक्ष्मी मासेकर, सदस्य रमेश मेणसे, विलास बेडरे, अरविंद पाटील, नांदुरकर, जोतिबा चौगुले, परशराम परीट, राजू डोण्dयाण्णावर यांनी प्रत्यक्ष समस्येच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. पाणी समस्येचे गांभीर्य लक्षात घेवून त्यांनी यातून मार्ग काढत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची हमी दिली. यासाठी या भागात शक्य झाल्यास नवीन कूपनलिकाही खोदण्याची संमती दर्शविली. यावेळी ग्रामस्थांनी पाण्यासाठी होणारी फरफट सांगितली. प्रामुख्याने महिलावर्गाने आपली पाणी भरताना होणारी तारांबळ सांगितली. सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी यलुप्पा पाटील, ग्राम पंचायत माजी सदस्य राजू उघाडेसह महिलावर्ग उपस्थित होता.









