बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार बनल्यानंतर गेल्या सात वर्षांत 30 हून अधिक डॉ. आंबेडकर भवन उभारली आहेत. डॉ. आंबेडकरांचा संदेश सर्वत्र पोहोचण्याच्या उद्देशाने पुतळे उभारण्यात येत असल्याची माहिती महिला-बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बेनकनहळ्ळी येथे डॉ. बी. आर. आंबेडकर समुदाय भवन बांधकामाचे भूमिपूजन बुधवारी मंत्री हेब्बाळकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. डॉ. आंबेडकरांचे कार्य हे आधुनिक बसवेश्वरांसारखे आहे. 12 व्या शतकात बसवेश्वरांनी केलेले सामाजिक कार्यच डॉ.आंबेडकरांनी करून दाखविले असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी नेते युवराज कदम, महेश कोलकार, मोहन कांबळे, मल्लेश चौगुले, रमेश तडेकर, अनिल कांबळे, सिद्धाप्पा कांबळे, सुरेखा कोलकार, रेणुका कोलकार आदी उपस्थित होते.
हंगरगा येथे सरकारी प्राथमिक मराठी शाळेला तीन जादा खोल्या व कन्नड शाळेसाठी एक जादा खोली उभारण्याच्या कामाचा शुभारंभ मंत्री हेब्बाळकर यांच्या हस्ते झाला. हंगरगा येथे सुमारे 62.56 लाख रुपये खर्चातून जादा खोल्या बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाळू पाटील, अर्जुन पाटील, मीना गोडसे, यल्लाप्पा पाटील, सुभाष तळवार, उमेश गोडसे आदी यावेळी उपस्थित होते. बेळगुंदी येथे महर्षि वाल्मिकी समुदाय भवनासाठी भूमिपूजन मंत्री हेब्बाळकर यांच्या हस्ते झाले. समुदाय भवन उभारल्याने समाजाला एकत्र येऊन सार्वजनिक काम करणे सुलभ होणार आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारे केंद्र समुदाय भवन ठरणार आहे, असे त्या म्हणाल्या. त्यानंतर बेळगुंदी येथील सरकारी मराठी शाळा आवारात प्रोफ्लेक्स शीट कामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला. यावेळी कृष्णा पाटील, शिवाजी बोकडे, दयानंद ताशिलदार, महादेव पाटील, रंजना गावडा, निंगुली चव्हाण, सविता तळवार उपस्थित होते.









