‘तरुण भारत’च्या वृत्ताची घेतली दखल : प्रवाशांमधून समाधान
बेळगाव : रेल्वे स्थानकासमोरील कॅन्टोन्मेंट बसस्थानकात अस्वच्छता असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे वृत्त ‘तरुण भारत’ने बुधवारी प्रसिद्ध केले. मद्यपींचा सुरू असलेला धुडगूस आणि कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष याचा प्रवाशांना फटका बसत होता. बातमी प्रसिद्ध होताच कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांना जाग आली. बुधवारी सकाळीच कॅन्टोन्मेंट बसस्थानकाचा परिसर स्वच्छ करून चकाचक करण्यात आला. कारवार बसस्थानक नावाने प्रसिद्ध असलेल्या कॅन्टोन्मेंट बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. बसस्थानक स्मार्ट झाले परंतु येथे अनेक गैरसोयी असल्याने प्रवाशांचे हाल होत होते. ज्या ठिकाणी प्रवासी बसतात त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. यामुळे स्थानिक प्रवाशांसोबतच गोवा, कारवार व कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनाही याचा त्रास सहन करावा लागत होता. बुधवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी सर्व परिसराची स्वच्छता केली. त्याचबरोबर दारूच्या बाटल्या व कचराही दूर करण्यात आला. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी बस स्थानकाचा परिसर चकाचक झाला. यामुळे प्रवाशांनी ‘तऊण भारत’चे आभार मानले असून समाधान व्यक्त होत आहे.









