वृत्तसंस्था/ मियामी
जागतिक अग्रमानांकित एरीना साबालेन्काने दुसऱ्या सेटमध्ये संघर्ष करीत चीनच्या झेंग किनवेनचा पराभव करून मियामी ओपन 1000 मास्टर्स टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली.
बेलारुसच्या साबालेन्काने नवव्या मानांकित किनवेनवर 6-2, 7-5 अशी मात केली. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. पुढील फेरीत तिची लढत इटलीच्या जस्मिन पावोलिनीशी होईल. पावोलिनीने उपांत्य फेरी गाठताना पोलंडच्या मॅग्डा लिनेटचा 6-3, 6-2 असा सहज फडशा पाडला. सहाव्या मानांकित पावोलिनीने मागील वर्षी विम्बल्डन व प्रेंच ओपन स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पावसामुळे हा सामना मध्येच थांबवण्यात आला होता. पण एकाग्रता भंग होऊ न देताना तिने लिनेटवर लगेचच नियंत्रण मिळवित सामना संपवला. लिनेटने आधीच्या फेरीत अमेरिकेच्या कोका गॉफला पराभवाचा धक्का दिला होता. पावोलिनीने गेल्या वर्षी दुबईतील स्पर्धा जिंकली होती, ती आता दुसरी डब्ल्यूटीए 1000 स्पर्धा जिंकण्यास सज्ज झाली आहे.
द्वितीय मानांकित इगा स्वायटेक व फिलिपिन्सची अलेक्झांड्रा इआला आणि ब्रिटनची एम्मा राडुकानू व अमेरिकेची चौथी मानांकित जेसिका पेगुला यांच्यात उपांत्यपूर्व लढती होणार आहेत.









