वृत्तसंस्था/ .सोल
दक्षिण कोरियाच्या आग्नेय भागात लागलेल्या जंगलातील आगीत 24 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून येथील जंगलात वणवा पसरला असून तो विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग विझविताना अग्निशमन दलाचे एक हेलिकॉप्टर कोसळले असून त्यात पायलटचा मृत्यू झाला. ही जंगलातील आग दक्षिण कोरियातील सर्वात भीषण आगींपैकी एक मानली जाते. आगीमुळे 27,000 हून अधिक लोकांना आपले घर सोडावे लागले आहे.
जोरदार वारे आणि कोरड्या हवामानामुळे आग वेगाने पसरत असल्यामुळे संपूर्ण वस्त्या जळून खाक होत आहेत. सरकारने विविध भागात अग्निशमन दलाचे 10,000 हून अधिक जवान तैनात केले आहेत. तसेच हवाई दलाच्या 87 हेलिकॉप्टरचा वापरही केला जात आहे. या आगीच्या दुर्घटनेमुळे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांसह इतर अनेक ऐतिहासिक स्थळे धोक्यात आली आहेत.









