दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी निधी प्रकरणात तिहार तुरुंगात असलेले बारामुल्लाचे खासदार शेख अब्दुल रशीद सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात लोकसभेच्या कामकाजात सहभागी होऊ शकतील. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना संसद अधिवेशनासाठी उपस्थित राहण्यास अनुमती दिली आहे. खासदार रशीद यांना 26 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान पोलीस कडक सुरक्षेमध्ये संसदेत घेऊन जातील आणि अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा तुरुंगात घेऊन जातील. या काळात त्यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधता येणार नाही.
लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी रशीद यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मंगळवारी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. यापूर्वी 19 मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सत्र न्यायालयाने त्यांना कस्टडी पॅरोल देण्यास नकार दिला होता. यानंतर रशीद यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी निधीच्या आरोपाखाली रशीदना 2017 मध्ये अटक करण्यात आली होती. ते 2019 पासून तिहार तुरुंगात आहेत. रशीद यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तुरुंगात असूनही विजय मिळवला होता.









