गाझामध्ये काढला मोर्चा : युद्ध नको असल्याच्या दिल्या घोषणा
वृत्तसंस्था/ गाझापट्टी
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान आता हजारो पॅलेस्टिनी नागरिकांनी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. पॅलेस्टिनी नागरिकांनी आता हमासला गाझामधून हद्दपार करण्याची मागणी केली आहे. पहिल्यांदाच गाझामध्ये लोकांनी हमासच्या विरोधात मोर्चा काढला आणि घोषणाबाजी करत हमासला गाझा सोडण्याचा अल्टीमेटम दिला आहे.
आम्हाला युद्ध नको आणि हमासही नको. आम्हाला शांततेत जगायचे आहे असे गाझामधील लोकांनी म्हटले आहे. पांढऱ्या रंगाचा ध्वज फडकवत लोकांनी शांततेची मागणी केली आहे. गाझामधून हमासला हाकला अशा घोषणा यावेळी पॅलेस्टिनी लोकांनी दिल्या आहेत. पॅलेस्टिनी लोकांची निर्णायक भूमिक पाहता आता हमासला गाझापट्टीतून बाहेर पडावे लागणार असल्याचे मानले जात आहे.
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर भीषण हल्ले केले होते, यात 1200 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक इस्रायलींचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर इस्रायलने केलेल्या हमासविरोधी कारवाईत आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून लोक संघर्षामुळे हतबल झाले आहेत.
या युद्धाचा उद्देश हमासचा खात्मा करणे असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी वारंवार म्हटले आहे. इस्रायलने जानेवारीमध्ये झालेल्या संघर्षविराम कराराच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप हमासने केला आहे. आम्ही अद्याप चर्चेसाठी तयार आहोत, अमेरिकेच्या अध्यक्षांचे विशेष प्रतिनिधी स्टीव विटकॉफ यांच्याकडून सादर करार प्रस्तावांवर विचार करत असल्याचे हमासकडून सांगण्यात आले.









