भाजप अन् अण्णाद्रमुक आघाडीची शक्यता : अमित शाह यांची पक्षाच्या नेत्यांनी घेतली भेट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तामिळनाडूत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकचे महासचिव एडप्पादी के. पलानिस्वामी हे पुन्हा भाजपसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. पलानिस्वमी यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी पोहोचत त्यांच्याशी चर्चा केली आहे. या भेटीनंतर पलानिस्वामी हे रालोआत परतणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सप्टेंबर 2023 मध्ये अण्णाद्रमुकने भाजपसोबतची आघाडी संपुष्टात आणली होती. तामिळनाडूत भाजपची वाढती महत्त्वाकांक्षा आणि द्रविड आयकॉन पेरियारविषयी भाजप नेत्यांच्या कथित आक्षेपार्ह टिप्पणींमुळे अण्णाद्रमुकने हा निर्णय घेतला होता. तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीकरताही अण्णाद्रमुकने भाजपसोबत आघाडी केली नव्हती. याचा फटका अण्णाद्रमुकला बसला होता.
अनेक आठवड्यांपासून सुरू आहे चर्चा
भाजप आणि अण्णाद्रमुक दरम्यान अनेक आठवड्यांपासून चर्चा सुरू असल्याचे समजते. आमचा पक्ष आघाडीकरता पुढाकार घेण्यास तयार आहे. याचा अर्थ आम्ही भाजपसोबत मिळून काम करण्यास तयार आहोत, जर भाजपने आमच्या चिंता समजून घेतल्या तर अण्णाद्रमुक आणि भाजप यांच्यात आघाडी होऊ शकते असे पलानिस्वामी यांच्या एका निकटवर्तीय नेत्याने सांगितले आहे.
अण्णाद्रमुकने पहिल्यांदा 2016 मध्ये जे. जयललिता यांच्या निधनानंतर भाजपसोबत आघाडी केली होती. अण्णाद्रमुकने द्रमुक-काँग्रेसच्या आघाडीला तोंड देण्यासाठी भाजपसोबत हातमिळवणी केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकने 22 तर भाजपने 5 जागांवर निवडणूक लढविली होती. परंतु आघाडीला केवळ एका जागेवर यश मिळाले होते. तर द्रमुक-काँग्रेस आघाडीने 38 जागा जिंकल्या होत्या.
विधानसभा निवडणुकीतही अपयश
यानंतरही दोन्ही पक्ष एकत्र राहिले आणि 2021 ची विधानसभा निवडणूक आघाडी अंतर्गत लढविली. अण्णाद्रमुकला 66 जागा तर भाजपला 4 जागा मिळाल्या होत्या. परंतु राज्याची सत्ता द्रमुकच्या हाती गेली होती. द्रमुकने 159 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला पहिल्यांदाच तामिळनाडू विधानसभेत प्रवेश करता आला. परंतु आघाडीच्या पराभवामुळे अण्णाद्रमुकने भाजपसोबतच्या संबंधांवर पुनर्विचार सुरू केला होता आणि मग पलानिस्वामी यांनी हळूहळू भाजपसोबत अंतर राखण्यास सुरुवात केली होती. सप्टेंबर 2023 मध्ये अण्णाद्रमुकने भाजपसोबतची आघाडी संपुष्टात आणत रालोआतून काढता पाय घेतला होता. यामागील मुख्य कारण तामिळनाडू भाजप अध्यक्ष के. अण्णामलाई यांची काही वक्तव्यं असल्याचे अण्णाद्रमुकचे म्हणणे होते. तर भाजप अण्णाद्रमुकचे स्थान घेऊ पाहत असल्याचा संशय पलानिस्वामी यांना होता.
लोकसभा निवडणुकीत फटका
अण्णाद्रमुक आणि भाजपने मागील लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविली होती. अण्णाद्रमुकने डीएमडीके आणि एसडीपीआयसोबत आघाडी केली, परंतु या आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. तर या आघाडीची मतांची हिस्सेदारी 20.46 टक्के राहिली. भाजपने पीएमके आणि टीएमसीसोबत आघाडी केली होती. या आघाडीला 18.28 टक्के मते मिळाली होती.
राज्याच्या राजकारणावरील प्रभाव
भाजप आणि अण्णाद्रमुक हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले तर तामिळनाडूच्या राजकारणात मोठे बदल दिसून येऊ शकतात. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास त्यांची मतांची संयुक्त हिस्सेदारी 35-40 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. यामुळे द्रमुकसमोर मोठे आव्हान उभे ठाकू शकते. अण्णाद्रमुकचा पश्चिम तामिळनाडू (कोइम्बतूर, सलेम) आणि दक्षिणेतील जिल्ह्यांमध्ये मोठा प्रभाव आहे, तर भाजपला कन्याकुमारी आणि कोइम्बतूर यासारख्या क्षेत्रांमध्ये समर्थन मिळते. ही आघाडी क्षेत्रीय संतुलन साधू शकते. अण्णाद्रमुक आणि भाजप एकत्र आल्यास द्रमुक-काँग्रेसच्या ध्रूवीकरणाच्या राजकारणाला फटका बसू शकतो. खासकरून अल्पसंख्याक मतांवरील द्रमुकचे वर्चस्व कमकुवत होऊ शकते.









