7 सत्रातील तेजी थांबली, ऑटो निर्देशांक मात्र नफ्यात
नवी दिल्ली
: सलग सात दिवसांच्या तेजीनंतर भारतीय शेअर बाजार बुधवारी घसरणीसह बंद झाल्याचे दिसून आले. सेन्सेक्स निर्देशांक 728 अंकांनी घसरणीत राहिला होता. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 728 अंकांनी घसरत 77,288 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 181 अंकांनी घसरून 23486 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 26 समभागांमध्ये घसरण पाहायला मिळाली तर 4 समभाग हे तेजीसमवेत बंद झाले. बाजारातील व्यवहारांमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक 3.36 टक्के इतके वाढत बंद झाले. दुसरीकडे एनटीपीसीचे समभाग आणि झोमॅटोचे समभाग मात्र दोन टक्केपेक्षा अधिक घसरणीत राहिले. निफ्टी निर्देशांकात पाहता 50 समभागांपैकी 40 समभाग हे घसरणीसह बंद झाले तर 10 समभाग तेजीसमवेत बंद झाले. शेअर बाजारात पॉवरग्रिड कॉर्प, टायटन आणि महिंद्रा या कंपन्यांचे समभाग वधारलेले दिसून आले.
विविध क्षेत्राच्या निर्देशांकांचा विचार करता माध्यम, सरकारी बँक, रिअल्टी आणि हेल्थकेअर क्षेत्राच्या निर्देशांकामध्ये तीन टक्क्यांपेक्षा अधिक घसरण पाहायला मिळाली. निफ्टी ऑटो निर्देशांक मात्र तेजीसोबत बंद झाला होता. जागतिक बाजारामध्ये मिळताजुळता कल पाहायला मिळाला. आशियाई बाजारात जपानचा निक्केई 0.65 टक्के तेजीत होता तर हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 0.60 टक्के तेजित होता. दुसरीकडे चीनचा शांघाय कंपोझिट मात्र 0.038 टक्के नुकसानीत होता.
28 मार्चला अमेरिकेतील डो जोन्स सपाट स्तरावर बंद झाला. नॅसडॅक कंपोझिट मात्र 0.46 टक्के वाढत व्यवहार करत होता. 25 मार्च रोजी विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 5371 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले तर दुसरीकडे देशांतर्गत गुंतवणूकदारांनी मात्र 2768 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले.
अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राबवण्यात येणारे व्यापारी धोरण आणि त्या संदर्भातली अनिश्चितता याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. याच दरम्यान भारतीय कंपन्यांचे मार्च तिमाही निकाल हे काहीसे नरम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला असून त्याचाही परिणाम शेअर बाजारात बुधवारी पाहायला मिळाला.









