सांगली :
महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांची मंगळवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. गुप्ता यांची नागपूर येथे विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी बदलीचे आदेश काढले आहेत. गुप्ता यांना बदलीच्या ठिकाणी तातडीने कार्यभार स्किारण्यास सांगण्यात आले आहे.
मागील जवळपास दीड वर्षापासून आयुक्तपदावर असलेले गुप्ता हे वाढीव घरपट्टीसह अनेक विषयावरून टिकेचे धनी झाले होते. गुप्ता यांच्या जागी आयुक्त म्हणून कोण याबाबत मनपा क्षेत्रामध्ये मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान मनपाचे नवे आयुक्त म्हणून त्रिगुण कुलकर्णी, विजय कुलकर्णी यांच्यासह अनेकांच्या नावाची जोरदार चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे. विद्यमान नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर आयुक्त म्हणून रूजू झाल्यानंतर शुभम गुप्ता यांच्याकडे मनपाच्या प्रशासकपदाचीही जबाबदारी होती. त्यांच्या काळात मनपात अनेक विषय वादग्रस्त ठरले. वाढीव घरपट्टीवरून नागरिकांचा रोष सहन करावा लागला. पण यावरून राज्यातील सत्ताधारी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना वाढीव घरपट्टीचा मुद्दा अडचणीचा झाला होता. आमदार सुधीर गाडगीळ, आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी वाढीव घरपट्टीला सहा महिन्यांची स्थगिती देण्याची मागणी केली होती. विरोधी पक्षांचे आमदार म्हणून जयंत पाटील, विश्वजीत कदम यांनीही अधिवेशनात आवाज उठविला होता. खा. विशाल पाटील यांनीही मुद्या लावून धरला होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाढीव घरपट्टीवाढीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. मनपा सफाई कामगारांच्या बदल्या, समुद्रा कंपनीकडील वीजेचा प्रश्न आदी विषयावरूनही गुप्ता यांच्यावर मोटी टिका होत होती








