वडूज :
स्वत:च्या दोन महिन्याच्या मुलाची विष पाजून हत्या केल्याप्रकरणी वाई तालुक्यातील शिरूर येथील रणजीत सुरेश बुलुंगे (वय 33, रा. सुरूर, ता. वाई) यास वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याबाबत सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जानेवारी 2018 रोजी आरोपी रणजीत सुरेश बुलुंगे याने त्याचा मुलगा कु. वेदांत (वय 2 महिने 19 दिवस) यास दत्तक देण्याबाबत पत्नीच्या माहेरकडील लोकांना सांगत होता. माहेरच्या लोकांनी त्यास दत्तक देण्यास विरोध केल्याच्या कारणावरून आरोपीने 20 जानेवारी 2018 रोजी रात्री 9:30 वाजता मुलाच्या टॉनिकच्या बाटलीत विषारी औषध मिसळून त्याला पाजले. यामध्ये मुलगा वेदांत याची प्रकृती बिघडल्याने त्यास उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे दाखल केले. उपचार चालू असताना तो 21 रोजी रात्री 9 वाजता मयत झाला.
याबाबत आरोपीने मुलगा वेदांत याचा विषारी औषध पाजून खून केला असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवले. वैद्यकीय पुरावे जमा केले व कसून तपास करून आरोपींविरुद्ध वडूज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील वैभव हरीश काटकर यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने 11 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपीला भा.द.वि.स कलम 302 अन्वये दोषी ठरवून आज आरोपी रणजीत सुरेश बुलूंगे यास जन्मठेप व 10 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
सदर खटल्यात उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, सपोनि दत्तात्रय दराडे यांनी मार्गदर्शन केले. प्रॉसिक्युशन स्क्वाडचे उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, हवालदार विजयालक्ष्मी दडस, सागर सजगणे, जयवंत शिंदे, अमीर शिकलगार यांनी सहकार्य केले.








