कराड :
तुफान वाऱ्यासह मंगळवारी दुपारी कराड शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. वाऱ्याचा वेग एवढा होता की दत्त चौकातील सूर्या कॉम्प्लेक्सवरील भव्य लोखंडी जाहिरात फलकाचा मोठा पत्र्याचा भाग मोडून तो वाऱ्याच्या वेगाने थेट रस्त्यावर जाऊन पडला. पत्र्याचा भाग पडल्यानंतर अवघ्या काहे सेकंदात दुचाकीवरून तिथे पोहोचलेल्या दोन युवती दुचाकीवरून घसरून पडल्या. फलकाच्या पत्र्याच्या आवाजाने परिसरातील नागरिकांसह वाहनधारकांना धडकी भरली. मुंबईत भल्या मोठा आकाराचा फलक पडून अनेक निष्पाप जीव मृत्युमुखी पडले होते. या घटनेची पुनरावृत्ती कराडात झाली असती, अशी भीती व्यक्त होऊ लागली. दरम्यान, मुंबईतील दुर्घटनेनंतरही कराड शहर व परिसरात धोकादायक स्थितीत होर्डिंग कायम आहेत.
कराडचा दत्त चौकाला ‘हार्ट ऑफ सिटी’ म्हटले जाते. याच चौकात मंगळवारी मुंबईतील दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली. मुंबईत काही महिन्यांपूर्वी अवाढव्य आकाराचा फ्लेक्स कोसळून त्या खाली सापडून अनेक निष्पाप बळी गेले होते. मंगळवारी कराडच्या दत्त चौकात सूर्या कॉम्प्लेक्सवर लावलेले लोखंडी व जाड पत्र्याचे होर्डिंग तुफान वाऱ्याच्या वेगाने धडकी भरवणाऱ्या आवाजात हादरू लागला. साडेचारच्या सुमारास या फलकाच्या डाव्या बाजूचा भला मोठा भाग तुटला. तुटलेला सुमारे 3 बाय 4 एवढा फलकाचा भाग प्रचंड वेगाने धाडधाड करत बसस्थानक ते प्रशासकीय इमारत या रस्त्यावरील सूर्या कॉम्प्लेक्ससमोरच्या रस्त्यावर कोसळला.

- युवतींसह कारचालकास जीवदान
इमारतीवरून वाऱ्याच्या वेगाने तुटलेल्या फलकाचा भाग जेव्हा वर्दळ असलेल्या रस्त्यावर कोसळला, तेव्हा रस्त्यावर तुरळक वाहने होती. मात्र पत्रा रस्त्यावर आपटला अन् काही सेकंदातच दोन युवती स्कूटीवरून तिथे पोहोचल्या. पावसात लक्षात न आल्याने त्यांची स्कूटी पत्र्यावरून गेल्याने घसरून युवती रस्त्यावर पडल्या. त्यांना किरकोळ जखम झाली. त्यांच्यापाठोपाठ येत असलेल्या कारचालकाने हा थरार पाहिला अन् जागेवर ब्रेक मारल्याने तोही बचावला. या होर्डिंगचा उर्वरित भागही उचकटला असून तो कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत होता. मंगळवारी बाजारपेठेत साप्ताहिक बंद असतो. त्यामुळे रस्त्यावर तुरळक वाहने होती. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या होर्डिंगबाबत पालिकेकडे तक्रारी होऊनही व बेकायदेशीर होर्डिंग काढण्याचे शासनाचे आदेश असतानाही पालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासकीय इमारत परिसरात एका वठलेल्या झाडाची फांदी वाहनांवर कोसळली. तर रेव्हिन्यू क्लबसमोरच्या आयलॅण्डमध्ये लावलेला फ्लेक्सही रस्त्यावर आडवा झाला.
- झाडे कोसळली…रस्ते पाण्याखाली गेले
वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने कराड परिसरातील जनजीवन अवघ्या पंधरा मिनिटात विस्कळीत केले. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने प्रीतिसंगम बागेतील दोन मोठी झाडे कोसळली. सुदैवाने झाडाच्या परिसरात कोणी नसल्याने अनर्थ टळला. शिक्षक कॉलनी येथे रस्त्याकडेला लावलेल्या चार चाकी वाहनांवर दोन भली मोठी झाडे कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले. नव्या उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने दोन्ही बाजूंचा सेवारस्ता कराड ते मलकापूर यादरम्यान सहा ते सात ठिकाणी फूटभर पाण्याखाली गेला. त्यामुळे हायवेची वाहतूक मंदावली. वाहनधारकांची प्रचंड गैरसोय झाली. ठिकठिकाणी झाडांचा पालपाचोळा, फांद्या रस्त्यावर पडल्या होत्या. पहिल्याच पावसाने कराडमध्ये दाणादाण उडाली असून अपघात होऊ नयेत, यासाठी पावले उचलण्याची मागणी होत आहे.








