मंडणगड :
यशतेज फाऊंडेशन मंडणगड यांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांनी मंगळवारी वेळास येथे ऑलिव्ह रिडले कासवांचा जन्मसोहळा अनुभवला. पहाटे समुद्री किनारच्या हॅचरीत सुरक्षित करण्यात आलेल्या अंड्यातील 34 पिल्ले अंड्यातून बाहेर पडून समुद्रकिनाऱ्याकडे झेपावली. दरम्यान, कासवांची पिल्ले अंड्यांतून बाहेर पडण्यास सुऊवात झाल्याने लवकरच कासव महोत्सवाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
यावेळी कासवमित्र मोहन उपाध्ये यांनी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांसह इतर कासवांच्या प्रजातींविषयी माहिती दिली. पहाटे साडेचार वाजता शहरातून दाखल झालेल्या नागरिकांनी सूर्योदयावेळी समुद्रकिनारी हा जन्मसोहळा प्रत्यक्ष अनुभवला. कासवांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेळास या गावी कासव वीणीच्या हंगामास सुऊवात झाली आहे. यंदा वेळास येथे समुद्र किनाऱ्यावर 32 घरट्यांमध्ये 3,579 अंडी सुरक्षित करण्यात आली आहेत. कासवांची पिल्ले अंड्यातून बाहेर पडण्यास सुऊवात झाली आहे. यंदाही या कासवांचा जन्मसोहळा पाहण्यासाठी पर्यटक व अभ्यासकांसाठी अंड्यातून पिल्ले केव्हा बाहेर पडतील, त्याची माहिती स्थानिक व कासवमित्रांकडून प्राप्त होत आहे. त्यानुसार वेळास गावात पर्यटक अभ्यासकांची गर्दी वाढत आहे. यापुढील काळात लवकरच कासव महोत्सवाची तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.








