कोल्हापूर :
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरमध्ये होण्याबाबत शुक्रवार 28 रोजी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. सायंकाळी साडे पाच वाजता मुंबई उच्च न्यायालय येथे बैठकीस सुरवात होणार असल्याचे पत्र मुंबई उच्च न्यायालयातर्फे नुकतेच खंडपीठ कृती समितीला प्राप्त झाले असल्याची माहिती समितीचे निमंत्रक सर्जेराव खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीक्ष आणि उच्च न्यायालयातील प्रशासकीय न्यायमूर्ती यांच्यासमवेत प्रथमच खंडपीठबाबत बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खोत म्हणाले, खंडपीठ कोल्हापूरमध्ये होण्यासाठी गेली चाळीस वर्ष लढा सुरु आहे. सन 2022 मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश दिपांकर दत्ता यांच्यासोबत या प्रश्नी बैठक झाली होती. त्यानंतर खंडपीठ स्थापनेबबातचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे कोल्हापूरमध्ये खंडपीठ होणेबाबत 2 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन दिले होते. त्याचबरोबरच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा सुरु आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे नुकतेच खंडपीठ कृती समितीचे पत्र आले असून शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालय येथे महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. पत्रकार परिषदेला अॅङ महादेवराव आडगुळे, शिवाजीराव राणे, रणजीत गावडे, नारायण भांदीगरे, संतोष शहा, सुरिंदर जैन, कमलाकांत कुलकर्णी, सोनाली शेठ, स्नेहलता सावंत, सरिता घोरपडे, अजय कोराणे, मोहन कुशिरे, उज्वल नागेशकर आदी उपस्थित होते.
- खंडपीठासाठी पंढरपूर ते कोल्हापूर रथयात्रा
कोल्हापूरमध्ये खंडपीठ होण्यासाठी पंढरपूर ते कोल्हापूर रथयात्रा काढण्यात येणार आहे. 4 एप्रिलपासून पंढरपूर येथून सकाळी 8.30 वाजता रथयात्रेला सुरुवात होईल. पंढरपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश चौगुले यांनी या रथयात्रेचे नियोजन केले आहे. पंढरपूरमधून निघणारी हि रथयात्रा वाटेतील गावांना भेटी देत 5 किंवा 6 एप्रिलरोजी कोल्हापूरमध्ये दाखल होईल. कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाईला खंडपीठ स्थापन होण्याबाबत साकडं घालत रथयात्रेची सांगता होणार आहे.








