राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप : पूजा राणी, सोनिया लाथेर, संजना, संजू यांच्यासह उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ ग्रेटर नोएडा
ऑल इंडिया पोलीस दलाची महिला बॉक्सर मीनाक्षीने आठव्या इलाईट महिलांच्या राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 48 किलो वजन गटातील जेतेपद स्वत:कडेच राखण्याच्या दिशेने आगेकूच केली असून तिने हरियाणाची वर्ल्ड चॅम्पियन नीतू घंघासला पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत स्थान मिळविले.
24 वर्षीय मीनाक्षी ही आशियाई चॅम्पियनशिपमधील रौप्यविजेती बॉक्सर असून नीतूविरुद्ध तीनही फेऱ्यांत वर्चस्व गाजवत 4-1 असा विजय मिळविला. नीतू ही संभाव्य विजेती असल्याचे मानले जात होते. पण मीनाक्षीने तिचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आणत सनसनाटी निर्माण केली. नीतू ही 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील तसेच 2023 वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील सुवर्णविजेती आहे. येथील लढतीत तिला लय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागल्याचे दिसून आले. अधूनमधून तिने जोरदार पंचेस लगावत चमक दाखविली. पण मीनाक्षीने सतत प्रतिहल्ले करीत नीतूच्या हालचाली कौशल्याने निष्प्रभ ठरविल्या.
‘राष्ट्रकुल स्पर्धेसाठी झालेल्या चाचणीत मला नीतूकडून पराभूत झाले होते, त्यामुळे ही लढत कठीण जाणार याचा अंदाज होता. पण विजय मिळविल्याने मी खूप समाधानी आहे,’ असे मीनाक्षी नंतर म्हणाली. तिची पुढील लढत दिल्लीच्या संजनाशी होईल. संजनाने चमकदार लढतीत चंदिगडच्या गु•ाrचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
अन्य लढतीत 75 किलो वजन गटात पूजा राणी, 54 किलो वजन गटात सोनिया लाथेर यांनीही उपांत्य फेरीत स्थान मिळविले. रेल्वेच्या पूजाने कोमलचा 5-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला. याआधीच्या राष्ट्रीय स्पर्धेत दोघींनीही मिडलवेट गटात पदके मिळविली होती. सोनिया लाथेरला मात्र चंदिगडच्या मोनिकाला हरविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. तिने मोनिकाचे कडवे आव्हान परतावून लावताना 4-3 असा निसटता विजय मिळवित आगेकूच केली. याशिवाय 60 किलो वजन गटात पोलीस दलाची संजू, उत्तर प्रदेशची अपराजिता मणी यांनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवित शेवटच्या चार फेरीत स्थान मिळविले.
युवा वर्ल्ड व राष्ट्रीय चॅम्पियन सनामाचा चानूनेही लाईट मिडलवेट (70 किलो) गटात उपांत्य फेरी गाठली असून तिने कर्नाटकच्या एए सांची बोलम्माचा पहिल्याच फेरीत पराभव केला. 70 किलो गटातील विद्यमान चॅम्पियन राजस्थानच्या ललितानेही उपांत्य फेरीत स्थान मिळविले. तिने पंजाबच्या कोमलप्रीत कौरवर 4-1 अशी संघर्षपूर्ण मात केली. एसएसपीबीच्या साक्षीने लडाखच्या कुलसूमचा एकतर्फी पराभव करून शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. मागील वेळी साक्षीने रौप्यपदक मिळविले होते. यावेळी तिला सुवर्ण मिळविण्यासाठी आणखी दोन विजय मिळवावे लागतील.









