हा दौरा चिथावणी देणारा : पंतप्रधान
वृत्तसंस्था / ग्रीनलँड
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांच्या पत्नी उषा वेन्स या 27-29 मार्च या कालावधीत ग्रीनलँडच्या दौऱ्यावर असणार आहेत, परंतु त्यांच्या या दौऱ्यापूर्वी वाद उभा ठाकला आहे. ग्रीनलँडचे पंतप्रधान म्यूट एगेडे यांनी उषा वेन्स यांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी या हायप्रोफाइल दौऱ्याला चिथावणी देणारा ठरविले आहे. अमेरिकेसोबत करण्यात आलेल्या करारामुळे उषा वेन्स यांना ग्रीनलँडमधील अमेरिकेच्या सैन्यतळाचा दौरा करण्यापासून रोखणे शक्य नाही. परंतु अंतरिम सरकार अमेरिकेच्या शिष्टमंडळाला भेटणार नसल्याचे एगेडे यांनी सांगितले आहे.
उषा वेन्स यांच्यासोबत अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वाल्ट्ज आणि ऊर्जा सचिव क्रिस राइट ग्रीनलँडमध्ये पोहोचणार आहेत. या दौऱ्याच्या दोन महिन्यांपूर्वी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ज्येष्ठ पुत्र ट्रम्प ज्युनियर हे ग्रीनलँडमध्ये पोहोचले होते, तेव्हा त्यांनी याला खासगी दौरा ठरविले होते. माझ्या ग्रीनलँड दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांदरम्यान परस्पर सन्मान आणि सहकार्याच्या दीर्घ इतिहासाचा जल्लोष करणे असल्याचे उषा वेन्स यांनी एक व्हिडिओ मेसेज शेअर करत म्हटले आहे. उषा वेन्स यांच्या या दौऱ्याचा उद्देश ग्रीनलँडच्या स्वयंनिर्णायाचा सन्मान करणारी आणि आर्थिक सहकार्याला चालना देणारी भागीदारी निर्माण करणे असल्याचे वक्तव्य व्हाइट हाउसच्या प्रवक्त्याने नमूद केले आहे. अमेरिकेने यापूर्वीच दोन हर्क्यूलिस सैन्य वाहतूक विमाने ग्रीनलँडमध्ये पाठविली असून यात सुरक्षा कर्मचारी आणि बुलेटप्रूफ वाहने आहेत. डेन्मार्कने देखील अमेरिकेच्या शिष्टमंडळाच्या सुरक्षेसाठी मोठ्या संख्येत पोलीस कर्मचाऱ्यांना ग्रीनलँडमध्ये तैनात केले आहे.
ट्रम्प यांच्या वक्तव्यांमुळे नाराजी
ट्रम्प यांनी अनेकदा ग्रीनलँडवर अमेरिका नियंत्रण मिळविणार असल्याची वक्तव्यं केली आहेत. राष्ट्रीय सुरक्षेसाठी ग्रीनलँडवर अमेरिकेने नियंत्रण मिळविणे अत्यंत आवश्यक असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांच्या या म्हणण्याला प्रत्युत्तर देत ग्रीनलँडने आम्ही विकाऊ नसल्याचे सुनावले होते. ग्रीनलँड उत्तर अटलांटिक महासागरातील एक बेट असून ते डेन्मार्कच्या नियंत्रणाखालील एक स्वायत्त क्षेत्र आहे. ग्रीनलँडमध्ये 57 हजार लोकांचे वास्तव्य आहे. याचे क्षेत्रफळ जवळपास 21 लाख चौरस किलोमीटर आहे. तसेच येथे नियोडायनियम, प्रासियोडायमियम, डिस्प्रोसियम, टर्बियम आणि यूरेनियम यासारख्या अनेक दुर्लभ खनिजांचा भांडार आहे.









