यमुना सफाई, स्वच्छ पाण्यासाठी 9 हजार कोटीची तरतूद : 10 लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत
वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी पहिल्यांदा 1 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. महिला समृद्धी योजनेसाठी या अर्थसंकल्पात 5100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून दिल्लीतील महिलांना दर महिन्याला 2500 रुपये दिले जातील. यमुना आणि सांडपाण्याच्या सफाईसाठी 9 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आयुष्मान योजनेसाठी 2144 हजार कोटी रुपयांचा निधी दिला. केंद्र सरकारकडून 5 लाख रुपयांपर्यचा मोफत उपचार मिळणार आहे, याचबरोबर दिल्ली सरकार देखील यात स्वत:च्या वतीने 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार दिल्लीवासीयांना पुरविणार आहे. म्हणजेच आयुष्मान योजनेच्या अंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे.
अरविंद केजरीवालांनी स्वत:च्या लाभासाठी आयुष्मान योजना दिल्लीत लागू होऊ दिली नाही. योजनेत स्वत:चे नाव जोडले जावे, जेणेकरून त्यांचा प्रचार होईल अशी केजरीवालांची इच्छा होती. त्यांच्या हट्टामुळे दिल्लीवासीयांना अनेक वर्षांपर्यंत योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे रेखा गुप्ता यांनी म्हटले आहे.
मातृत्व वंदन योजनेसाठी गुप्ता यांनी 210 कोटी रुपयांची तरतूद केली ओह. योजनेच्या अंतर्गत गरोदर महिलांना 21 हजार रुपये दिले जाणार आहेत. याचबरोबर दिल्लीत महिला सुरक्षेसाठी 50 हजार अतिरिक्त कॅमेरे बसविले जाणार आहेत.
गरिबांना मोफत लॅपटॉप
गरीब विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येणार आहे. 10 वी उत्तीर्ण झालेल्या 1200 विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्यात येईल. तर सायन्स ऑफ लिव्हिंग प्रोग्राम अंतर्गत मुलांना योग, ध्यानाशी जोडले जाणार असून याकरता 1.5 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तर शाळांमध्ये नवी कॉम्प्युटर लॅब निर्माण करण्यासाठी आणि स्मार्ट क्लासेससाठी 100 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात आहे.
शिक्षणात सुधारासाठी 100 कोटी
शिक्षणाच्या क्षेत्रात सुधारासाठी मुख्यमंत्र्यांनी 100 कोटीची तरतूद केली आहे. पंडित मदन मोहन मालवीय विज्ञानशक्ती मिशन लागू करण्यात येईल. परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तर 100 शाळांमध्ये प्रयोगशाळा सुरू करण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांना सर्व भाषांचे धडे देण्यात येणार असून याकरता 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
रुग्णालयांसाठी 1 हजार कोटी
दिल्लीतील रुग्णालयांची स्थिती सुधारण्यासाठी 1 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक रुग्णाची नोंद ठेवत प्राथमिक आरोग्य सेवांचा विस्तार केला जाणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
यमुनेसाठी 500 कोटीचा निधी
यमुना साफ करणे आमची प्राथमिकता आहे. दिल्ली सध्या जलसंकट, सांडपाण्याचा योग्य निचरा न होणे, प्रदूषित जलाशयांना सामोरी जात आहे. मागील सरकारने दिल्लीची तहान भागविली नाही आणि जलसंकटही दूर केले नाही. यमुना आमची माता असून आराध्य अन् सांस्कृतिक वारसा आहे. 500 कोटी रुपयांच्या निधीतून 50 डी सेंट्रलाइज्ड सीवेज प्लॅन्ट निर्माण केले जातील, जेणेकरून नदीत सांडपाणी दाखल होणार नाही. सांडपाण्यावरील प्रक्रियेची क्षमता वाढविण्यात येईल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
40 कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. तर भारत सरकारकडून 2 हजार कोटीची मदत मागण्यात आली आहे. जल प्राधिकरणाकरता 50 कोटीची तर रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी 50 कोटी आणि आपत्कालीन जलसाठवणुकीसाठी 150 कोटीची तरतूद करण्यात आली असल्याचे गुप्ता यांनी सांगितले आहे.
टँकर्सना जीपीएसशी जोडणार
3 कोटीच्या लोकसंख्येला स्वच्छ पेयजल पुरविण्याचे लक्ष्य आहे. उन्हाळ्यात होणारा टँकर घोटाळा टाळण्यासाठी टँकर्सना आता जीपीएसशी जोडले जाईल. इंटेलिजेंट मीटर जोडण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.









