वृत्तसंस्था/ शिलाँग
वर्षातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात मालदीवचा 3-0 असा पराभव केल्यानंतर भारतीय फुटबॉल संघाचा आत्मविश्वास वाढलेला असला, तरी आज मंगळवारी येथे होणाऱ्या 2027 एएफसी आशियाई कप पात्रता फेरीच्या सामन्यात भारताला कठीण बांगलादेशचा सामना करताना सावध राहावे लागेल.
19 मार्च रोजी येथे भारताने आपल्याहून कमी क्रमांकावर असलेल्या मालदीववर दणदणीत विजय मिळवला, जो मानोलो मार्केझच्या नेतृत्वाखाली पहिला विजय होता. हा विजय महत्त्वपूर्ण होता. कारण त्यात सुनील छेत्रीने त्याच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनात एक उत्कृष्ट गोल केला. हा भारतीय संघातर्फे त्याचा 95 वा गोल होता. बांगलादेश हा भारतासाठी परिचित, पण कठीण प्रतिस्पर्धी आहे आणि इतिहास पाहता दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत तेव्हा तेव्हा हा सामना सोपा गेलेला नाही.
भारत सध्या फिफा यादीत 126 व्या स्थानावर आहे, तर बांगलादेश 185 व्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमधील शेवटचा सामना मालदीवमध्ये झालेल्या 2021 च्या सॅफ स्पर्धेत पाहायला मिळाला होता आणि तो 1-1 असा बरोबरीत सुटला होता. त्यातही छेत्रीने भारताचा गोल केला होता. 2022 च्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या सामन्यात बांगलादेशवर भारताने 2-0 असा विजय मिळविला होता आणि त्यात छेत्रीने भारताचे दोन्ही गोल केले होते.
बांगलादेश त्यांना असलेल्या संधींचा पुरेपूर फायदा उठविण्याचा प्रयत्न करेल. कारण त्यांच्याकडे इंग्लिश प्रीमियर लीगमधील खेळाडू हमजा चौधरी आहे, जो सध्या लोनवर शेफिल्ड युनायटेडकडून खेळत आहे. परंतु भारताचे मुख्य प्रशिक्षक मार्केझ यांना हमजाची अनावश्यक काळजी वाटत नाही. ते म्हणाले की, जर संघ आपल्या योजनांनुसार खेळला, तर आज विजय मिळेल. आजचा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. कारण कोणतीही चूक त्यांना 2027 च्या एएफसी आशियाई कपमध्ये प्रवेश करण्यापासून वंचित करू शकते.









