‘ज्वालामुखी’सदृश आवाजाने परिसर हादरला
वृत्तसंस्था/ बरेली
उत्तर प्रदेशातील बरेलीतील बिथरी चैनपूर पोलीस स्टेशन परिसरातील राजौ परसापूर येथील महालक्ष्मी गॅस एजन्सीच्या गोदामात सोमवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाल्याने गॅस एजन्सीच्या गोदामात मोठी आग लागली. या घटनेत 350 हून अधिक सिलिंडर फुटल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे. मात्र, प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. गोदामामध्ये झालेल्या स्फोटामागील कारण शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.
गोदामातील सिलिंडर्सचा स्फोट झाल्यानंतर परिसरात विखुरलेल्या टाक्यांमधील आवाज काही मिनिटे सुरूच राहिल्यामुळे आजूबाजूचा परिसर हादरला. सुमारे दीड तास एकामागून एक सिलिंडर फुटत राहिले. स्फोटांसह हवेत उडणाऱ्या सिलिंडरचे तुकडे सुमारे 500 मीटरच्या परिघात शेतात पडल्याचे दिसून येत होते. याचदरम्यान गोदामातून आगीच्या ज्वाळा उठताना पाहून राजौ परसापूर गावात घबराट पसरली. स्फोटाच्या आवाजाने ज्वालामुखी फुटल्यासारखे वाटल्याची आपबीती स्थानिकांनी व्यक्त केली. स्थानिकांनी या घटनेचे व्हिडिओ मोबाईलबद्ध करत व्हायरल केले आहेत. घटनेवेळी गोदामात फक्त सुरक्षारक्षक आणि ट्रकचालक उपस्थित होता. दोघांनीही पळून जाऊन आपले प्राण वाचवले. गोदाम लोकवस्तीपासून खूप दूर असल्याने जीवितहानी टळली.
इंडेनच्या महालक्ष्मी गॅस एजन्सीचे गोदाम राजौ परसापूर गावापासून सुमारे 500 मीटर अंतरावर आहे. एजन्सीचे वॉचमन दिनेश चंद्र शुक्ला यांच्या मते, सिलिंडरने भरलेला एक ट्रक गोदामात उतरवण्याची प्रक्रिया सुरू असताना ट्रकच्या बोनेटला आग लागली. सुरक्षारक्षकाने आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आग विझली नसल्याने त्याने घटनास्थळावरून पळ काढला. तसेच ट्रकचालकही लांबपर्यंत पळून गेला. सुरुवातीला ट्रकमध्ये ठेवलेल्या सिलिंडर्सचा स्फोट झाला. त्यानंतर गोदामाला आग लागून स्फोट होऊ लागले, असे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. स्फोटांमुळे आग विझवणे कठीण झाले. ही घटना इतकी भीषण होती की सिलिंडर्सचे तुकडे 500 मीटर अंतरावर शेतात पडले होते.









