यादीत सर्वाधिक संस्था महाराष्ट्रातील : दिल्लीतील एका कॉलेजचे नाव सामील
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरातील एकूण 160 संस्थांना चालू वर्षात विदेशी योगदान (विनियमन) अधिनियम (एफसीआरए) प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. एफसीआरए परवाना मिळाल्याने या संस्थांना कायदेशीर स्वरुपात विदेशातून देणगी मिळविण्याची अनुमती मिळाली आहे. एफसीआरए प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्यांमध्ये दिल्लीतील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स देखील सामील आहे.
गृह मंत्रालयाने एफसीआरए अंतर्गत अर्जांची पडताळणी केल्यावर हे प्रमाणपत्र जारी केले आहे. एफसीआरए अंतर्गत व्यक्ती, कंपन्या आणि स्वयंसेवी संघटना, शैक्षणिक संस्था आणि अन्य संघटनांना विदेशी देणगी मिळविण्याची मंजुरी मिळते. विदेशी देणगीचा वापर योग्य अन् पारदर्शकपणे केला जाईल याकरता एफसीआरए लागू करण्यात आला होता. तसेच या विदेशी देणगीद्वारे भारताचे सार्वभौमत्व आणि अंतर्गत सुरक्षेला नुकसान पोहोचणार नाही हे सुनिश्चित केले जाते. अधिकृत आकडेवारीनुसार एफसीआरए प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे.
महाराष्ट्रातील 25 संस्थांना एफसीआरए प्रमाणपत्र मिळाले आहे. तर तामिळनाडूतील 21 संस्थांना विदेशातून देणगी मिळविण्यास मंजुरी मिळाली आहे. दिल्ली आणि कर्नाटकातील प्रत्येकी 13 तर तेलंगणातील 12 संस्थांना एफसीआरएचे प्रमाणपत्र मिळाले. गुजरातमधील 11, पश्चिम बंगालमधील 8 आणि उत्तरप्रदेशातील 7 संस्थांना विदेशातून देणगी मिळविता येणार आहे.
5 वर्षांसाठी प्रमाणपत्र मान्य
याचबरोबर आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, हरियाणा आणि राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये प्रत्येकी 5 संस्थांना एफसीआरएची मंजुरी मिळाली. दिल्ली आधारित 13 संस्थांसोबत ज्या 147 संस्थांना एफसीआरए प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांचा संबंध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आणि आर्थिक घडामोडींशी निगडित क्षेत्रांशी आहे. एफसीआरए प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या शैक्षणिक संस्था त्यांचे वाढते आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शैक्षणिक संशोधन, मूलभूत सुविधांचा विकास आणि शिष्यवृत्तीसाठी विदेशी देणगी आकर्षित करण्याचे प्रयत्न दर्शवितात. एफसीआरए प्रमाणपत्र 5 वर्षांसाठी मान्य असेल. परंतु याकरता संबंधित संस्थेला नियमांचे पालन आणि देणगीचा योग्य कारणासाठी वापर करावा लागणार आहे.









