जुब्बडहट्टी विमानतळावरील प्रकार
वृत्तसंस्था/ शिमला
हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील जुब्बडहट्टी विमानतळावर सोमवारी सकाळी एक मोठी विमान दुर्घटना सुदैवाने टळली आहे. दिल्लीहून शिमला येथे पोहोचलेल्या एलाइन्स एअरच्या विमानाला इमर्जन्सी ब्रेक लावून रोखण्यात आले आहे. विमानाने निम्म्या धावपट्टीवर लँडिंग केले होते, याचदरम्यान विमानाचा टायर फुटला होता. या विमानातून उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि पोलीस महासंचालक डॉ. अतुल वर्मा हे प्रवास करत होते.
विमान धावपट्टीवरून न घसरल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव धर्मशाळा येथे जाणाऱ्या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. एलायन्स एअरच्या विमानाच्या वैमानिकाने विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाच्या ब्रेकमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कळविले होते. तर संबंधित घटनेनंतर विमानाची पाहणी करण्यात येत आहे. विमानात कोणता बिघाड झाला होता हे डीजीसीएच सांगू शकणार आहे. परंतु लँडिंगदरम्यान विमान निर्धारित जागेपेक्षा पुढे पोहोचले होते. या घटनेतंर 20-25 मिनिटांपर्यंत प्रवाशांना विमानात थांबविण्यात आले होते अशी माहिती उपमुख्यमंत्री अग्निहोत्री यांनी दिली आहे. तर विमानाचा टायर फुटला होता आणि इमर्जन्सी ब्रेकचा वापर करावा लागल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. याप्रकरणी नागरी उड्डाण मंत्र्यांशी चर्चा केली जाईल असे मुख्यमंत्री सुक्खू यांनी सांगितले आहे.









