आजपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात
बेळगाव : ई-आस्थीअंतर्गत ए व बी खाता नोंदणीसाठीचे अर्ज आजपासून संबंधित प्रभागातच स्वीकारले जाणार आहेत. यासाठी शहरात 13 ठिकाणी अर्ज भरणा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्या ठिकाणी प्रत्येकी एक कॉम्प्युटर, प्रिंटर व दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून नागरिकांना ई-आस्थीचे अर्ज दाखल करण्यासाठी महानगरपालिकेत जाण्याची गरज नाही. प्रभाग क्र. 1 ते 7 मधील नागरिकांनी राणी चन्नम्मानगर सेकंड स्टेज येथील बुडा कम्युनिटी हॉल, प्रभाग क्र. 8 ते 14 येथील रहिवाशांनी चावडी गल्ली, वडगाव येथील मल्लिकार्जुन मंदिर, प्रभाग 15 ते 20 मधील रहिवाशांनी गोवावेस शॉपिंग कॉम्प्लेक्स, गोवावेस, प्रभाग 21 ते 26 मधील कचेरी गल्ली येथील मनपाचे कार्यालय,
प्रभाग 27 ते 32 मधील रहिवाशांनी रामलिंगखिंड गल्ली येथील टिळक चौक, प्रभाग क्र. 33 ते 39 मधील रहिवाशांनी कांबळी खूट गणपत गल्ली येथील सरकारी मराठी शाळा, प्रभाग 40 ते 43 मधील रहिवाशांनी हनुमाननगर येथील हनुमान मंदिर, प्रभाग क्र. 44 ते 50 मधील रहिवाशांनी सदाशिवनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, प्रभाग क्र. 51 ते 58 मधील रहिवाशांनी महांतेशनगर येथील महांत भवन, त्याचबरोबर महापालिकेच्या विभागीय कार्यालय असलेल्या अशोकनगर, कोनवाळ गल्ली, रिसालदार गल्ली, गोवावेस कॉम्प्लेक्स येथील कार्यालयांमध्ये जाऊन ई-आस्थी अंतर्गत ए, बी खाता नोंदणीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन मनपाच्या महसूल विभागाकडून करण्यात आले आहे. या एकूण 13 ठिकाणी अर्ज भरणा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
महापालिका आयुक्त शुभा बी. यांच्या सूचनेनुसार प्रभारी महसूल उपायुक्त संतोष अनिशेट्टर, साहाय्यक महसूल अधिकारी परशराम मेत्री यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज स्वीकारण्यासह संबंधितांना ए व बी खात्यांचे वितरण केले जाणार आहे. यापूर्वीही महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत अर्ज स्वीकारण्यासह खात्यांचे वितरण केले जात होते. मात्र, शहरातील सर्व प्रभागांमधील मिळकतधारकांना त्याचा लाभ व्हावा, यासाठी आता शहरात 13 ठिकाणी ए व बी खाता वितरण केले जाणार आहे. याकामी महापालिकेतील महसूल विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मिळकतधारकांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीत न येता संबंधित केंद्रांना भेटी देऊन त्या ठिकाणीच ई-आस्थीसाठी अर्ज करण्यासह ए व बी खाता मिळवावा, असे आवाहन प्रभारी महसूल उपायुक्त संतोष अनिशेट्टर यांनी केले आहे.









