शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावतर्फे शहरात दर्शन यात्रा
बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने धर्मवीर बलिदान मासनिमित्त सांगली येथून प्रज्वलित करण्यात आलेली धर्मवीर ज्वाला आणण्यात आली. कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहरप्रमुख अनंत चौगुले, तालुकाप्रमुख परशराम कोकितकर, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील यांच्यावतीने सकाळी 6.30 वाजता गणेश मंदिर, चन्नम्मा चौक येथे स्वागत करण्यात आले. यानंतर मोटारसायकल फेरी काढून ज्वालेची दर्शनयात्रा काढण्यात आली. कॉलेज रोड, श्री शंभूतीर्थ धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, बसवाण गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौकमार्गे ताशिलदार गल्ली सोमनाथ मंदिर येथे यात्रेची सांगता करण्यात आली. किरण गावडे यांनी धारकऱ्यांना बलिदान मासनिमित्त मार्गदर्शन केले.
शुक्रवार दि. 28 रोजी धर्मवीर ज्वाला संपूर्ण तालुका विभाग तसेच गावभागांमध्ये वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व तालुक्यातील धारकऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील यांनी केले. ही धर्मवीर ज्वाला शहरप्रमुख अनंत चौगुले व गो-सेवा प्रमुख हिरामणी मुचंडीकर यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथून आणण्यात आली. पुढील संपूर्ण आठवडा धर्मवीर ज्वाला ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिर येथे दर्शनासाठी उपलब्ध असेल. सर्व शिवशंभू भक्तांनी ज्वालेचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी सर्व विभागप्रमुख तसेच शेकडो धारकरी उपस्थित होते.









