वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर रविवारी प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. काही गाड्यांच्या सुटण्यास उशीर झाल्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 12 आणि 13 वर मोठ्या संख्येने प्रवासी जमले होते. रात्री आठ वाजल्यानंतर बऱ्याच रेल्वेगाड्यांना उशीर झाल्यामुळे प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी जमली. याचदरम्यान परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की गर्दी व्यवस्थापनाचे आव्हान महाकुंभमेळ्यादरम्यान झालेल्या कुंभमेळ्यासारखे वाटू लागले. तथापि, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना केल्या.
नवी दिल्ली रेल्वेस्थानकावरून शिवगंगा एक्स्प्रेस रात्री 08:05 वाजता निघणार होती पण ती रात्री 09:20 वाजता निघाली. त्याचप्रमाणे, स्वतंत्र सेनानी एक्स्प्रेस रात्री 09:15 वाजता निघणार होती, परंतु ती आधीच प्लॅटफॉर्मवर उभी होती. जम्मू राजधानी एक्स्प्रेस रात्री 09:25 वाजता निघणार होती, पण या रेल्वेलाही विलंब झाला. तसेच लखनौ मेलचे प्रस्थान रात्री 10:00 वाजता होणार होते मात्र, ही ट्रेन देखील उशिराने फलाटावर लागली होती. मगध एक्स्प्रेस रात्री 09:05 वाजता निघणार होती पण ती कोणत्याही प्लॅटफॉर्मवर उभी नव्हती.
स्थानकावरील गोंधळाबाबत रेल्वे मंत्रालयाने एक निवेदनही जारी केले आहे. सायंकाळनंतर नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर मोठी गर्दी होती, परंतु चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती नव्हती. होल्डिंग क्षेत्रातून अनारक्षित प्रवाशांना नेण्यासाठीच्या नियमांचे पालन केले जात असल्याचे सांगण्यात आले.









