चीनवर मात करण्यासाठी ट्रम्प यांचा निर्णय : सहाव्या पिढीच्या लढाऊ विमानाच्या निर्मिती
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहाव्य पिढीच्या लढाऊ विमानाच्या निर्मितीची अधिकृत घोषणा केली आहे. व्हाइट हाउसच्या ओव्हल ऑफिसमध्ये संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्या उपस्थितीत ट्रम्प यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्यानुसार या लढाऊ विमानाचे नाव एफ-47 असेल, ज्याला नेक्स्ट जनरेशन एअर डॉमिनेन्स (एनजीएडी) प्रकल्पाच्या अंर्तत विकसित केले जाणार आहे.
एफ-47 अमेरिकेन वायुदलात एफ-22 रॅप्टरची जागा घेणार आहे. एनजीएडी सिस्टीम एक अत्याधुनिक नेटवर्क-कनेक्टेड प्लॅटफॉर्म असेल, ज्यात स्टील्थ फायटर जेट, ड्रोन तंत्रज्ञान आणि अन्य अत्याधुनिक सुटे भाग सामील असतील. हा प्रकल्प 2020 मध्ये सरू करण्यात आला होता, परंतु अत्याधिक खर्चामुळे तो रोखण्यात आला होता. आता ट्रम्प प्रशासनाने हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रकल्पाचा खर्च अधिक
नेक्स्ट जनरेशन एअर डॉमिनेन्स प्रकल्पाचा खर्च एफ-35 लढाऊ विमानाच्या तुलनेत तीनपट अधिक असू शकतो. एक एनजीएडी लढाऊ विमान निर्माण करण्यासाठी 300 दशलक्ष डॉलसपर्यंतचा खर्च येऊ शकतो. चीन यापूर्वीच अमेरिकेच्या एनजीएडी प्रकल्पाशी स्पर्धा करण्यासाठी एक नव्या लढाऊ विमानाची निर्मिती करत आहे. 26 डिसेंबर 2024 रोजी चीनने स्वत:च्या सहाव्या पिढीच्या लढाऊ विमानाचे अनावरण केले होते, याला चेंगदू जे-36 नाव देण्यात आलेआहे. परंतु आतापर्यंत या लढाऊ विमानाची वैशिष्ट्यो आणि तांत्रिक क्षमतांविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही.
एफ-47 लढाऊ विमानाची क्षमता
अमेरिकेत जेव्हा पहिल्यांदा सहाव्या पिढीच्या लढाऊ विमानाचा प्रस्ताव मांडण्यात आला तेव्हा याच्या काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांचा खुलासा करण्यात आला होता. एफ-47 लढाऊ विमानाला अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुटेभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि सुपर-पॉवरफुल इंजिनने युक्त केले जाणार आहे. या लढाऊ विमानाच्या डिझाइन आणि विकासासाठी सध्या बोइंगला 20 अब्ज डॉलर्सचा निधी दिला जाईल.
एफ-47 मध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञान…
ब्रॉड स्पेक्ट्रम स्टील्थ : रडारला चकविण्यासाठी विमानासाठी अत्याधुनिक स्टील्थ तंत्रज्ञानाचा वापर होईल.
नेक्स्ट जनरेशन पॉवर प्लँट्स : अधिक वेग आणि दक्षतेसाठी आधुनिक इंजिन.
गायडेड एनर्जी वेपन्स : लेझर आणि मायक्रोवेव आधारित शस्त्रास्त्र प्रणाली.
युनिफाइड इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टीम : शत्रूच्या रडार आणि संचार प्रणालींना रोखण्याची क्षमता
पर्यायी मॅनिंग : मोहिमेच्या आवश्यकतेनुसार मानव संचालित किंवा वैमानिकाशिवाय ऑपरेट करण्याची सुविधा









