सांगली :
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार घेण्यात आलेल्या लोक अदालतमध्ये जिल्हयातील एक हजार ९३९ दावापूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली करणेत आली. तसेच सर्व न्यायालयातील मिळून एक हजार ४६७ प्रलंबीत प्रकरणे अशी एकूण तीन हजार ४०६ प्रकरणे निकाली करणेत आली. यातून एकूण रक्कम २८ कोटी ४८ लाख ३२ हजार ९५४ इतक्या रक्कमेची वसूली करणेत आली.
जिल्हयात महालोकअदालतचे शनिवारी आयोजन करणेत आले होते. सदर लोकन्यायालयाचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली पी. के. शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली झाले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सांगली, यांनी उपस्थित पक्षकारांना जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवून घेवून आपला वेळ व पैसा वाचविण्याचे आवाहन केले. जिल्हा न्यायाधीश क्रमांक चार डी. वाय. गौड तदर्थ जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम. एस. काकडे उपस्थित होत्या. सहाय्यक जिल्हा सरकारी वकील व्ही.एम. देशपांडे व वकील बार संघटनेचे अध्यक्ष किरण रजपूत व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
मोटार अपघात वाहन दावे प्रकरणांतील जखमी लक्ष्मण सूर्यवंशी यांस विमा कंपनी गो डिजीट इन्शुरन्स कंपनीकडून प्रकरण दाखल झाल्यापासून एक आठवडयाच्या आत दोन लाख २० हजार मंजूर करण्यात आले. मयत देवानंद चव्हाण यांच्या वारसांना ७५ लाख विमा कंपनी रॉयल सुंदरम इन्शुरंन्श कंपनीकडून देणेबाबत आदेश करणेत आले. विमा कंपनीतर्फे अॅड सचिन फाटक यांनी काम पाहिले. सांगली मुख्यालय येथे पॅनेलप्रमुख म्हणून डी.वाय. गौड, एम.एस. काकडे यांनी जिल्हा न्यायाधीश पॅनेलप्रमुख म्हणून तर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एम.एम.राव, श्रीमती व्ही.पी. गायकवाड, श्रीमती एन.के. पाटील, श्री व्ही.डी.पागी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सांगली, व्ही. व्ही. पाटील, डब्लू ए. सईद, जी.जी. चौंडे, एस. व्ही. बहिरट व ओ. एस. शास्त्री दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, सांगली यांनी काम पाहिले.
कन्सिलिएटर म्हणून जे. व्ही. नवले, मुक्ता दुबे, मोहन कुलकर्णी, श्रीमती सुनंदा पाटील, अमित पाटील, प्रशांत सोमण, गौरी पोतदार, एस.एम. पखाली, अॅड. अश्विनी झाडबुके, अश्विनी मोहिते, डॉ. पूजा नरवाडकर यांनी काम पाहिले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव गिरीजेश कांबळे यांनी नियोजन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक, नरहरी दांडेकर तसेच प्रफुल्ल मोकशी, नितीन आंबेकर, सागर पाटील, प्रियांका शिंदे, अमोल कोळेकर, विजय माळी, गौस नदाफ उपस्थित होते.








