अधिकृत वसाहतींमधीलच ग्राहकांना मिळणार वीज मीटर
प्रतिनिधी/ बेळगाव
नवीन घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना आता टेम्पररी वीज कनेक्शनसाठी बिल्डिंग परमिशन, तसेच अॅप्रुड प्लॅन गरजेचा आहे. ही दोन्ही कागदपत्रे असतील तरच यापुढे वीज मीटर दिले जाणार आहे. त्यामुळे बाँडद्वारे प्लॉट खरेदी केलेल्या नागरिकांना मोठा फटका बसला आहे. त्यांना वीज कनेक्शनविना थांबण्याची वेळ आली आहे.
अनधिकृत वसाहती निर्माण होत असल्याने त्यांना सोयीसुविधा पुरविणे सरकारला डोईजड होत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी नोंदणी केलेले (सबरजिस्ट्रार) प्लॉट खरेदी केलेल्यांना ए आणि बी खाता करून संबंधित प्लॉट अधिकृत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातून मिळणाऱ्या महसुलातून सरकार त्याठिकाणी सुविधा पुरविणार आहे. परंतु बेळगाव शहरातील 50 ते 60 टक्के भागात बाँड खरेदीवर प्लॉट घेण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना अनधिकृत वसाहतींमध्ये गणले जात आहे.
न्यायालयाने दिलेल्या एका निकालाचा आधार घेऊन केईआरसीने राज्यातील सर्व अनधिकृत वसाहतींना वीज मीटर दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. ज्या नागरिकांकडे आवश्यक कागदपत्रे आहेत, त्यांनाच यापुढे वीज मीटर दिले जाणार असल्याचे केईआरसीने आठवडाभरापूर्वीच स्पष्ट केले. बेळगावसह राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. यामुळे अनधिकृत वसाहतींना दणका बसेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बेळगावमध्ये बाँडद्वारे प्लॉट खरेदी मोठ्या प्रमाणात झाली असल्याने मीटर मिळविण्यासाठी नागरिकांची तारेवरची कसरत सुरू आहे. परंतु हेस्कॉमने टेम्पररीसह परमनंट मीटर देणे पूर्णपणे बंद केले आहे. महानगरपालिका, तसेच ग्रा. पं. कडून बिल्डिंग परमिशन व अॅप्रुड प्लॅन दिल्यानंतरच कनेक्शन दिले जात आहे. यामुळे आठवडाभरात अनेक ग्राहकांना माघारी धाडण्यात आले आहे. यामुळे मीटर कसे घ्यायचे? असा प्रश्न बाँडद्वारे प्लॉट खरेदी केलेल्या नागरिकांसमोर आहे.









