वृत्तसंस्था / कोलकाता
विंडीज आणि द. आफ्रिकेचे क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी येणार आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यात भारत आणि विंडीज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका आयोजित केली आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात द.आफ्रिकेचा संघ भारतात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी दाखल होत आहे.
तब्बल 12 वर्षानंतर विंडीजचा क्रिकेट संघ भारतात पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळण्यासाठी येत आहेत. उभय संघातील पहिली कसोटी 2 ऑक्टोबरपासून मोहाली येथे सुरू होईल तर दुसरी कसोटी 10 ऑक्टोबरपासून कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळविली जाणार आहे. सदर माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. विंडीजचा क्रिकेट संघ यापूर्वी म्हणजे 2013-14 साली भारतात खेळण्यासाठी आला होता. त्या दौऱ्यात उभय संघात तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळविली गेली होती.
विंडीजची कसोटी मालिका संपल्यानंतर द. आफ्रिकेचा संघ भारतात दाखल होणार आहे. द. आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यात दोन कसोटी, तीन वनडे आणि 5 टी-20 सामने खेळणार आहे. भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी दिल्लीमध्ये तर दुसरी कसोटी गुवाहाटीमध्ये खेळविली जाईल. गुवाहाटी पहिल्यांदाच कसोटी सामन्याचे यजमानपद भूषवित आहे. भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होईल. या मालिकेतील पहिला सामना 30 नोव्हेंबरला रांचीमध्ये, दुसरा सामना 3 डिसेंबरला रायपूरमध्ये तर तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 6 डिसेंबरला विशाखापट्टनम येथे होणार आहे. उभय संघातील पाच सामन्यांच्या टी-2 मालिकेला 9 डिसेंबरपासून प्रारंभ होईल. टी-20 सामने 9, 11, 14, 17 आणि 19 डिसेंबरला खेळविले जातील. या सामन्यांची ठिकाणे नंतर जाहीर करण्यात येतील.
2025 च्या उत्तराधार्थ आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक वनडे क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भारत भूषवित आहे. सदर स्पर्धा सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होईल. दरम्यान या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. मात्र स्पर्धेतील सलामीचा सामना विशाखापट्टनम येथे खेळविला जाणार असून या स्पर्धेतील इतर सामने गुवाहाटी, मुलानपूर (पंजाब), थिरुवनंतपुरम आणि इंदोरमध्ये खेळविले जातील. अंतिम सामन्याचे ठिकाण नंतर जाहीर करण्यात येईल, असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.









