वृत्तसंस्था / वेलिंग्टन
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील पहिले तीन सामने झाले असून न्यूझीलंडने या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंड संघातील वेगवान गोलंदाज मॅक हेन्री याला दुखापत झाल्याने तो शेवटच्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. आता त्याच्या जागी जेम्सीसनला बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.
या मालिकेत पहिले दोन सामने न्यूझीलंडने मोठ्या फरकाने जिंकले. मात्र तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने शानदार विजय मिळवित न्यूझीलंडची आघाडी कमी केली आहे. आता या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी न्यूझीलंड संघाची निवड करण्यात आली आहे. कायली जेमीसन हा उपयुक्त वेगवान गोलंदाज असून ओरुरके, सोधी, निश्चाम, ब्रेसवेल यांच्यावर गोलंदाजीची भिस्त राहिल. अलिकडेच झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड संघाला अंतिम सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेत भारताने दोनवेळा न्यूझीलंडला पराभूत केले होते. या कामगिरीनंतर क्रिकेट न्यूझीलंडने संघ निवडीवेळी बरेच बदल करण्याचा निर्णय घेतला.
न्यूझीलंड- ब्रेसवेल (कर्णधार), अॅलेन, मिचेल हे, रॉबीसन, सिफर्ट, चॅपमन, फोकेस, मिचेल, निश्चाम, डफी, ओरुरके, सिरेस, सोधी आणि जेमिसन









