खरा स्वावलंबी भारत संपुआच्या काळातच असल्याचा दावा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी उत्पादन क्षेत्रातील कथित घसरणीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. उत्पादन क्षेत्राला झटका बसल्यानंतर आता कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरा ‘आत्मनिर्भर भारत’ काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारच्या काळात असल्याचा साक्षात्कार होईल, असा दावा खर्गे यांनी केला.
भारताला उत्पादन क्षेत्राचे केंद्र बनवण्याचे भारतीय जनता पक्षाने दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही, असेही खर्गे म्हणाले. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारचे ‘मेक इन इंडिया’ हे अंमलबजावणी करण्याऐवजी प्रसिद्धीला महत्त्व देत असल्याचेही ते म्हणाले. 2014 च्या जाहीरनाम्यात भाजपने भारताला ‘जागतिक उत्पादन केंद्र’ बनवण्यासंबंधी दहा आश्वासने दिली होती. मात्र, त्यापैकी एकही पूर्ण झालेले नाही. तसेच उत्पादन क्षेत्रातील रोजगारात मोठी घट आणि जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा कमी झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे, असा दावाही त्यांनी केला. भारताला प्राधान्य देण्याऐवजी, भारतीय उद्योजक परदेशात जाऊन तिथे कंपन्या स्थापन करत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.









