आपला देश अनेक परंपरा आणि रुढींनी भरलेला आहे. काही परंपरा आश्चर्यकारक आहेत, तर काही अनोख्या आणि अद्भूत आहेत. राजस्थानातील भीलवाडा भागात एक परंपरा अशी आहे, की जी भारतात तर सोडाच, पण जगात कोठे असण्याची शक्यता कमी आहे. या परंपरेनुसार एका जिवंत तरुणाला तिरडीवर झोपविले जाते आणि त्या तरुणाची अंत्ययात्राही काढली जाते. ही अंत्ययात्रा साधी नसते. तर एकादी वरात काढली जावी, अशा प्रकारे ती वाजत गाजत आणि रंग उधळत काढली जाते. डीजेचाही उपयोग यावेळी केला जातो.
ही अंत्ययात्रा मग एका विविक्षित स्थळी जाते. येथे या युवकाच्या दहन संस्काराची सर्व सज्जता केलेली असते. ही तिरडी या चितेवर ठेवली जाते. तथापि, चितेला अग्नी देण्याच्या आत तिरडीवर झोपविण्यात आलेला युवक तेथून पलायन करतो. हा विधी शीतला सप्तमी या तिथीला केला जातो. ही परंपरा थोडीथोडकी नव्हे, तर गेली 427 वर्षे सलगपणे पाळली जात आहे. ही अंत्ययात्रा पाहण्यासाठी प्रचंड संख्येने लोक येतात. या परिसरातील लोकांसमवेत बाहेरुन आलेले लोकही असतात. होळी पौर्णिमेनंतर 7 दिवसानी ही शीतला सप्तमी साजरी केली जाते.
या ‘अंत्ययात्रे’चा प्रारंभ चितोड येथील एका राजवाड्यापासून केला जातो. तिरडीवर झोपविलेला तरुण तसा जागाच असतो. तो कधी या तिरडीवरच उठून बसतो, तर कधी त्याचा एक हात किंवा पाय बाहेर आलेला असतो. या अंत्ययात्रेत महिलांना मात्र प्रवेश नसतो. या अंत्ययात्रेस समाविष्ट लोक अचकट विचकट हावभावही आणि भाषा करतात. नंतर ही अंत्ययात्रा ‘बडा मंदीर’ येथे पोहचते. ही प्रथा लोकांच्या मनातील वाईट भावना त्यांना बोलून व्यक्त करता याव्यात आणि त्यांचे मन पुढे वर्षभर शुद्ध रहावे, यासाठी आहे, असे मानले जाते.









