अलिकडच्या काळात विदेशांमध्ये सेकंड हँड वस्तू किंवा जुन्या वस्तू विकत घेण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. त्यामुळे तेथील अनेक लोक आपल्या घरातील जुन्या पण उपयोग करता येण्यासारख्या वस्तू अशा वस्तूंच्या दुकानांमध्ये विकतात. नंतर अन्य अनेक लोक त्या तेथून विकत घेतात. अशा वस्तूंच्या अनोखेपणावर आणि उपयुक्ततेवर त्यांची किंमत ठरते. कित्येकदा अशा वस्तू आपल्याला असे काही देऊन जातात की ज्याची आपण कल्पनाही करु शकलो नसतो. अशीच एक स्वारस्यपूर्ण घटना ब्रिटनमध्ये घडली आहे.
ब्रिटनमधील केंब्रिज येथे वास्तव्यास असणारे डेव्हिड वाईंडर यांना जुन्या वस्तू विकत घेण्याचा छंद आहे. तो माहीत असल्याने त्यांच्या पुत्राने त्यांना गेल्यावर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने त्यांना एका दुकानातून खरेदी केलेला जुना कॅमेरा भेट दिला. तो एक कोडॅक ब्राऊनी व्रेस्टा 3 प्रकारचा कॅमेरा होता, ज्याची निर्मिती 1960 ते 1965 या काळात केली जात होती. वाईंडर यांना ही भेट आवडली.
त्यांनी या कॅमेऱ्यात फिल्म रोल घालण्यासाठी तो उघडला, तेव्हा आत एक जुना फिल्म रोल असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी हा फिल्म रोल डेव्हलप करण्याचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे तो डेव्हलपिंगच्या दुकानात दिला. ती छायाचित्रे जेव्हा त्याच्या हाती पडली, तेव्हा ती एका परिवाराची आहेत, असे त्यांना समजून आले. ही छायाचित्रे या कुटुंबाच्या प्रवासाची असून ती ब्रिटनच्या मर्सीसाईड भागातील आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही छायाचित्रे फेसबुकच्या त्यांच्या ग्रूपवर टाकली. ती छायाचित्रे ज्या परिवाराची असतील त्यांना ती मिळावीत हा त्यांचा हेतू आहे. कदाचित, या कुटुंबाने आपले राहते घर सोडून ते दुसरीकडे रहावयास गेले असावेत आणि हा कॅमेरा फिल्म रोल सकट जुन्या घरातच राहिला असावा, किंवा कॅमेरा जुना झाल्याने तो उघडून न पाहताच या कुटुंबाने ते फेकून दिला असावा. आता हे कुटुंब हा कॅमेरा शोधत असावे, असे अनेक विचार त्यांच्या मनात चमकून केले. आतापर्यंत त्यांना फेसबुकवर काही प्रतिसाद आलेला नसला तरी, एका कुटुंबाचे आनंदाचे क्षण, जे त्या कुटुंबाने कॅमेराबद्ध केले आहेत, ते त्या कुटुंबाला परत मिळावेत, असे त्यांना वाटत आहे. त्यांच्या जुन्या वस्तूंच्या छंदाचा असाही उपयोग एका अपरिचित कुटुंबाला होऊ शकणार आहे.









