सांगली :
महापालिका प्रशासनाच्यावतीने शुक्रवारी येथील एल. के. ग्राफिक डिजिटल प्रिटिंग या व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आयुक्त शुभम गुप्ता यांनी स्वतः ही कारवाई केली. मनपा क्षेत्रातील विनापरवाना आस्थापनावर कारवाई होणार आहे. व्यवसायधारकांनी आपल्या व्यवसायाचा परवाना प्राप्त करून घेऊन व्यवसाय करावा, व कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त गुप्ता यांनी यावेळी केले.
शुभम गुप्ता यांनी सांगली येथील एल. के. ग्राफिक या विनापरवाना चालू असलेल्या डिजिटल प्रिंटींग प्रेसवर धडक कारवाई केली आहे. १८ हजार दंड वसूल करून बेकायदेशीर छपाई होणारे साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी सहा आयुक्त डॉ. प्रज्ञा त्रिभुवन, सचिन सागावकर, अनिल पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. जनहित याचिकेत उच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रामध्ये विनापरवाना होर्डिंग प्रिंटींग प्रेस, बेकायदेशीर होर्डिंग बोर्ड फलक आदींवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त यांनी सहाय्यक आयुक्तांना दिले होते. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील विविध तसेच डिजिटल प्रिंटींग प्रेस, विनापरवानगी घातलेल्या आस्थापनावर कारवाई होणार आहे.








