खटाव–वडूज :
कडेगाव तालुक्यातील वांगी येथील वाल्मीक नगर परिसरातील जुना सांगली सातारा रस्त्यावर दोन कारमध्ये झालेल्या भीषण धडकेत सातारा जिह्यातील खटाव तालुक्यातील पती–पत्नी जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.
विकास मोहिते (वय 45) व पुष्पा मोहिते (38, रा. खटाव, जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, विकास भिकू मोहिते हे आपल्या कार क्रमांक (एमएच-42-ए एच-1047) मधून काल, गुरुवार रात्री 11.45 दरम्यान ताकारी येथील कार्यक्रम आटपून आपल्या पत्नी व नातेवाईकसह गावी खटावकडे चालले होते. तर जमीर ईलाही आवटी (रा. महाबळेश्वर जि. सातारा) हा महाबळेश्वरकडुन कडेपुर वांगी मार्गे सांगलीला कार क्रमांक (एमएच-11-डीबी-5797) निघाले होते.
वाल्मिकी नगर येथे जमीर आवटी याने भरधाव वेगात समोरून येण्राया कारला जोराची धडक दिली. या भीषण धडकेत विकास मोहिते व पत्नी पुष्पा मोहिते हे जागीच ठार झाले. तर ऋतुजा रोहित तोरसे, विजया प्रकाश तोरसे, आरोही रोहीत तोरसे, आर्या अरुण तोरसे हे गंभीर जखमी झाले. चालक जमीर इलाई अवटी हा ही जखमी झाला. जखमींना कराड येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार करीत आहेत.
खटाव येथील मोहिते कुटुंबाची परिस्थिती मध्यम आहे. मृत विकास पशुधन खरेदी विक्री आणि वाहन व्यवसाय करत होते. तर त्यांच्या पत्नी पुष्पा या गृहिणी होत्या. मृत विकास यांचे वडील भिकू आणि आई पुतळाबाई वयोवृद्ध आहेत. तर शिरवळ येथे कंपणीत काम करत असलेला गजानन हा भाऊ आहे. मृत विकास मोहिते यांना अपत्य नव्हते. त्यांचा एक मुलगा आदित्य याचे काही वर्षांपूर्वी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता.
खटाव येथील तोरसे कुटुंबातील मुलाच्या शाळेतील कार्यक्रमासाठी मोहिते आणि तोरसे कुटुंबातील महिला व मुली ताकारी येथे गेले होते असे समजते. या नंतर परतीचा प्रवास करत असताना खेराड वांगी येथे हा भिषण अपघात झाला.
या घटनेमुळे खटाववर शोककळा पसरली. यावेळी दोघा पती आणि पत्नी यांना एकाच सरणावर अग्नी दिला गेला.








