लोकमान्य ग्रंथालय-बुलकतर्फे आयोजन : दीपाली दातार, अनिरुद्ध दडके, आसावरी संत यांनी केले अभिवाचन
बेळगाव
थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला।
पणती जपून ठेवा, अंधार फार झाला।।
हे आता कोणी कोणाला सांगायचे, असा आजचा आपला बहुताल आहे. एक अस्वस्थता, निराशा, खिन्नता आपल्या आसपास नांदते आहे. अशावेळी हे सर्व भेदून माणुसकीची पणती आपल्याला लावावीच लागणार आहे. हा आशावाद कवी हिमांशू व्यक्त करतात. त्यांच्याच कवितांवर आधारित ‘तेव्हाची गोष्ट’ हा कार्यक्रम सेतू अभिवाचन मंच पुणे यांच्यातर्फे झाला. लोकमान्य ग्रंथालय व बुलकच्यावतीने याचे आयोजन करण्यात आले होते. दीपाली दातार, अनिरुद्ध दडके व आसावरी संत यांनी हे अभिवाचन केले. हिमांशू यांचा जन्म सातारचा, त्यांचे बालपण महाराष्ट्राबाहेर वेगवेगळ्या प्रांतात गेले. त्यामुळे हिंदी, उर्दू आणि इंग्रजी वाचन भरपूर झाले. तरीही पालकांनी मराठीचे निरांजन तेवत ठेवलचं होतं. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले तरी त्यांचा पिंड हा कलेचा, संगीताचा, शायरीचा भोक्ताच राहिला. 1974 साली त्यांची कविता लोकांसमोर व्यक्त झाली. तर 1976 साली मंगेश पाडगांवकर यांच्या प्रोत्साहनाने बाबुळबन हा काव्यसंग्रही प्रसिद्ध झाला. हिमांशू यांच्या रुबाई मोठ्या अर्थपूर्ण आहेत. ते म्हणतात,
रुबाई आहे माझ्या जखमांचं गीत।
विकण्यासाठी लिहिलेलं भावगीत नाही दोस्त।।
जे शब्दांचा खुळखुळा वाजवून रमती।।।
मी वाचत नाही त्यांच्यासाठी कविता।।।।
परंतु या संवेदनशील मनाला व्यावसायिक वातावरणात रमणे कठीण होऊ लागले. आणि मग सुरू झाला स्वत:शीच संवाद. हा संवाद मग कवितेच्या माध्यमातून सतत व्यक्त होत राहिला. म्हणूनच आई आणि बाबा यांचा विरह त्यांच्या मनाला विकल करतो. तितकचं आजीशी असलेलं नातं सुद्धा. एका अर्थाने आजीच्याच सोबतीनेच कदाचित स्त्री मनाचे मूक रुदन त्यातून व्यक्त झाले.
कधी कधी चांदण्याच्या राती असेही घडते।
कोणी एकटे रडते पारिजाताच्या सड्यात।।
अशा अर्थाने ती व्यक्त होते. दु:खाची एक ठसठसणारी नस शोधण्याचा प्रयत्न सुधांशू करत राहिले. म्हणून तर
ही धूळ घालते फुंकर जखमांवरील।
रस्त्याना स्पर्शाची भाषा कळते।।
असे ते म्हणतात. पण त्याचवेळी।
‘घालतो कशाला सुकलेले रुद्राक्ष।।
पेल्यात शोधूया इथेच आपण मोक्ष’।।।
असा उपरोधही ते व्यक्त करतात. उपरोध, विरोधाभास, आंधळी भक्ती त्यांना खटकते, खुपते, गरजवंताला पाठ फिरवून देवासमोर मात्र सौदा करण्याची त्यांना तिडीक आहे. त्यामुळे माणसाच्या दुहेरी वर्तनावर.
‘आंधळ्याला एक दमडी देऊ नकोस,।
पांगळ्याला चतकोर भाकरी देऊ नकोस, ।।
हार मात्र भक्कम शंभरचा घे।।।
‘सहज भेटेल देव’ काळजी करू नकोस।।।।
असे ते सहज सांगून जातात. औद्योगिकीकरण, शहरीकरण या शहरांचा वेध त्यांच्या कविता घेतात. त्यातून वास्तवाचे काहीसे विदारक दर्शन घडते. मुखवटे सतत पाहायला मिळतात. कवी हिमांशू यांचा काव्यप्रवास मोठा आहे. राजकीय, सामाजिक वास्तववादी, उपरोधपूर्ण व त्याचवेळी अत्यंत तरल भावस्पर्शी कविता त्यांनी केल्या. आजच्या बदलत्या समाज व्यवस्थेची, त्यातला ढोंगीपणाची त्यांना चीड आहे. त्यावर ते प्रहार करतात. शेवटी माणसाचे जगणे आणि माणुसकीचे जपणे महत्त्वाचे आहे, याचे भानही त्यांना आहे. जगणे आपले करुणामय मनच अधिक अर्थपूर्ण करणार आहे, असा आशावादही त्यांना आहे.म्हणूनच ते म्हणतात,
हृदयात पाळलेल्या जखमातूनीच आता।
कंदील एक लावा अंधार फार झाला।।









