जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : जलजीवन मिशन योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याची कामे त्वरित पूर्ण करावीत, सर्व तालुक्यातील साहाय्यक कार्यकारी अभियंते व कार्यकारी अधिकाऱ्यांनी उन्हाळ्यात कोणत्याही गावाला पिण्याच्या कमतरता भासणार नाही, याची दखल घ्यावी, गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थिती जाणून घ्यावी, असा आदेश जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी दिला. येथील जि. पं. कार्यालय सभागृहात शुक्रवार दि. 21 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जलजीवन मिशन योजनेची विकास आढावा बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून शिंदे बोलत होते.
एप्रिल व मे महिन्यात गावांना पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. बहुग्राम योजनेच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत उन्हामुळे कमी होण्याची शक्यता असते. अशावेळी नजीकच्या कूपनलिका भाडेतत्त्वावर घेऊन गावांना मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध करून द्यावा. ग्राम पंचायतींमध्ये पाणीपुरवठा-मलनिस्सारण समित्या कशाप्रकारे कार्य करीत आहेत याचीही पाहणी करून अहवाल द्यावा, अशी सूचना तालुका पंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना केली.
जि. पं. चे योजना संचालक रवी बंगारेप्पनवर, मुख्य लेखापाल परशुराम दुडगुंटी, उपसचिव (प्रशासन) बसवराज हेग्गनायक, बेळगाव विभाग कार्यकारी अभियंता शशिकांत नाईक, चिकोडी विभाग कार्यकारी अभियंता पांडुरंग राव तसेच सर्व तालुक्यांचे साहाय्यक कार्यकारी अभियंते, कार्यकारी अधिकारी, ग्रा. पं. विकास अधिकारी, जिल्हा योजना व्यवस्थापक, जल परीक्षण प्रयोगशाळेचे कर्मचारी, व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.









