लोकसभेत संरक्षण मंत्रालयाची माहिती कॅन्टोन्मेंटमधील 1604 एकर जागेचा समावेश
बेळगाव : बेळगाव शहरामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डअंतर्गत 1604 एकर जागा असून कॅन्टोन्मेंटच्या बाहेर 1470 एकर संरक्षण मंत्रालयाची जागा आहे. तर बेळगाव शहराव्यतिरिक्त 354 एकर संरक्षण विभागाची जागा आहे. संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता 3430 एकर जागा सध्या संरक्षण दलाच्या ताब्यात असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली. शुक्रवारी खासदार जगदीश शेट्टर यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना संरक्षण मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली. बेळगाव शहरामध्ये व शहराच्या बाहेर संरक्षण मंत्रालयाची किती जागा आहे? किती जागा राज्य सरकारने संरक्षण मंत्रालयाला वापरण्यासाठी दिलेली आहे, असा प्रश्न शेट्टर यांनी विचारला. प्रश्नाला उत्तर देताना संजय सेठ म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात 3430 एकर जागा संरक्षण मंत्रालयाकडे आहे. कर्नाटक राज्य सरकारची कोणतीही जमीन भाडेतत्त्वावर संरक्षण मंत्रालयाकडे नाही. रामदुर्ग येथील फायरिंग रेंज राज्य सरकारने डिफेन्सला दिली आहे. 50 हेक्टर वनजमिनीत फायरिंग रेंज असून त्याचे भाडे वनविभागाला दिले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.









