जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक
बेळगाव : महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढत असून, आपल्या जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे, असे मत स्त्रीरोग तज्ञ डॉ. सविता कद्दू यांनी व्यक्त केले. महिला दिनाचे औचित्य साधून संजीवीनी फौंडेशन यांच्यावतीने 8 मार्च ते 8 एप्रिल हा महिना महिला आरोग्य जागृती महिना म्हणून पाळण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शिवमनगर येथील शिवमंदिरात ब्रेस्ट कॅन्सर या विषयावर त्या बोलत होत्या. व्यासपीठावर संस्थापक डॉ. सविता देगीनाळ, शिवम महिला संघाच्या अध्यक्षा सुरेखा नगरे, उपाध्यक्ष भाग्यश्री ताशिलदार उपस्थित होत्या. याप्रसंगी महिलांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे, डॉ. सविता यांनी दिली. रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मिताली कुकडोळकर यांनी स्वागतगीत सादर केले. डॉ. देगीनाळ यांच्या हस्ते डॉ. कद्दू यांचा सत्कार करण्यात आला. भाग्यश्री ताशिलदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पद्मा औशेकर यांनी केले. कावेरी लमाणी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी लता बायाण्णाचे यांनी विशेष परिश्रम घेतले.









