तिसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंड 9 विकेट्सने पराभूत : नवाजची आक्रमक नाबाद शतकी खेळी
वृत्तसंस्था/ ऑकलंड
हसन नवाजच्या 45 चेंडूत नाबाद 105 धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. शुक्रवारी ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडने 204 धावा केल्या. त्यानंतर पाकने विजयासाठीचे 205 धावांचे लक्ष्य 16 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. पाकिस्तानी सलामीवीर हसन नवाजने 105 धावांची नाबाद खेळी केली. तर कर्णधार आगा सलमान 51 धावांसह नाबाद राहिला. पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड 2-1 असा आघाडीवर आहे. उभय संघातील चौथा सामना दि. 23 रोजी होईल.
नाणेफेक गमावून फलंदाजीला आल्यानंतर न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. पॉवरप्लेमध्ये संघाने सलामीवीरांच्या विकेट गमावल्या. संघाच्या 3 धावांवर शाहीन शाह आफ्रिदीने फिन अॅलनला बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. टिम सेफर्टही 19 धावा करून बाद झाला. यानंतर मार्क चॅपमनने संघाची सूत्रे हाती घेतली. त्याने 44 चेंडूत 94 धावांची खेळी केली. या खेळीत 11 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. चॅपमनने डॅरिल मिशेलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 30 चेंडूत 55 धावांची भागीदारी केली. अखेरच्या टप्प्यात मायकेल ब्रेसवेलने 18 चेंडूत 31 धावांची वादळी खेळी करत संघाला 200 च्या पुढे नेले. इतर किवीज फलंदाज झटपट बाद झाल्याने न्यूझीलंडचा डाव 19.5 षटकांत 204 धावांत आटोपला. पाककडून हॅरिस रौफने 3 तर शाहिन आफ्रिदी, अब्रार अहमदने प्रत्येकी दोन बळी घेतले.
नवाजचे आक्रमक शतक
205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद हॅरिस आणि हसन नवाझ यांनी 74 धावांची दमदार सलामी दिली. हॅरिस 20 चेंडूत 41 धावा करुन बाद झाला. त्याला यष्टिरक्षक मायकेल हेच्या हाती जेकब डफीने झेलबाद केले. हॅरिस बाद झाल्यानंतर, नवाजने कर्णधार आगा सलमानसह संघाला विजयाकडे नेले. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी 133 धावांची नाबाद भागीदारी केली. नवाजने 45 चेंडूत 10 चौकार व 7 षटकारासह नाबाद 105 धावा फटकावल्या तर सलमान आगाने 31 चेंडूत नाबाद 51 धावा करत त्याला चांगली साथ दिली. पाकने विजयी लक्ष्य 16 षटकांतच पूर्ण करत दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडकडून जेकब डफीने एकमेव बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 19.5 षटकांत सर्वबाद 204 (टीफ सेफर्ट 19, मार्क चॅपमन 94, मायकेल ब्रेसवेल 31, ईश सोधी 10, शाहिन आफ्रिदी, अब्रार अहमद प्रत्येकी दोन बळी, हॅरिस रौफ 3 बळी)
पाकिस्तान 16 षटकांत 1 बाद 207 (मोहम्मद हॅरिस 41, हसन नवाज नाबाद 105, सलमान आगा नाबाद 51, जेकब डफी 1 बळी).









