विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली माहिती : पाकिस्तानच आरोप फेटाळला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कैलास मानसरोवर यात्रेबद्दल भारत आणि चीन यांच्यात सहमती झाली आहे. यानुसार कैलास मानसरोवर यात्रा चालू वर्षत सुरू होणार आहे, परंतु यात्रेचा मार्ग कुठला असावा यावर चर्चा अद्याप सुरू असल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी शुक्रवारी दिली. सीमापार दहशतवादाला पाकिस्तानचे समर्थन क्षेत्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी सर्वात मोठा अडथळा आहे. पाकिस्तानकडून दहशतवादाला बळ पुरविण्यामागील खरा उद्देश कुणापासून लपून राहिला नसल्याचे जायस्वाल यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने भारतावर दहशतवाद फैलावण्याचा आरोप केला होता, त्यालाच विदेश मंत्रालयाने प्रत्युत्तर दिले आहे.
भारत आणि अमेरिका द्विपक्षीय व्यापार चर्चा पुढे नेण्याच्या प्रक्रियेत आहेत. दोन्ही देशांचे सरकार बीटीएसाठी एक रेपरुषा तयार करण्यासाठी सक्रीय स्वरुपात काम करत आहेत, ज्याचा उद्देश व्यापाराचा विस्तार करणे, बाजारपेठेतील पोहोच वाढविणे, शुल्क अन् बिगरशुल्क अडथळे कमी करणे असणार आहे. भारत सरकार परस्पर स्वरुपात लाभदायक बहुक्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार करारावर पोहोचण्यासाठी विविध स्तरांवर अमेरिकेच्या प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
भारत आणि पेरूदरम्यान मुक्त व्यापार करारावर चर्चा 2017 मध्ये सुरू झाली होती. आतापर्यंत चर्चेच्या 7 फेऱ्या पार पडल्या असून दोन्ही देश आठव्या फेरीसाठी संपर्कात असल्याचे विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
युक्रेन-रशिया युद्धासंबंधी भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार करत विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने भारत नेहमीच चर्चा आणि कूटनीतिक मार्गाने संघर्षाच्या स्थायी तोडग्याचा पक्षधर राहिला असल्याचे स्पष्ट केले. संघर्ष कमी करणे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी व्यवहार्य तोडगा काढता यावा म्हणून दोन्ही देश आणि प्रमुख संबंधित घटकांसोबत भारत सातत्याने संपर्कात असल्याचे जायस्वाल म्हणाले.
निमंत्रण तर संबंधांवर निर्भर..
विदेश मंत्रालयाने पुन्हा एकदा पाकिस्तानला सुनावले आहे. पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पाकिस्तानी उच्चायोगात आयोजित इफ्तार पार्टीमध्ये कुठल्या भारतीय अधिकाऱ्याला आमंत्रित करण्यात आले होते का अशी विचारणा झाली. यावर जायस्वाल यांनी निमंत्रण हे संबंधांवर निर्भर करते असे म्हटले आहे.









