बिम्सटेक परिषदेदरम्यान मोदी घेणार नाहीत भेट : बांगलादेशने केलेली विनंती फेटाळली
वृत्तसंस्था/ ढाका
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस हे पुढील महिन्यात थायलंडमध्ये आमने-सामने येणार आहेत. परंतु यादरम्यान दोघांदरम्यान औपचारिक भेट होण्याची शक्यता नाही. मोदी आणि युनूस हे 3-4 एप्रिल रोजी बँकॉकमध्ये होणाऱ्या बिम्सटेक शिखर परिषदेत भाग घेणार आहेत. एका बहुपक्षीय परिषदेकरिता मोदी आणि युनूस पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. बांगलादेशने बिम्सटेक परिषदेदरम्यान औपचारिक भेटीची विनंती भारत सरकारकडे केली होती. मोहम्मद युनूस यांचे विदेश विषयक सल्लागार तौहीद हुसैन यांनी याची पुष्टी दिली. परंतु दोन्ही देशांच्या संबंधांची वर्तमान स्थिती पाहता ही भेट होणार नसल्याचे मानले जात आहे.
भेट किंवा अभिवादनाची शक्यता फेटाळता येणार नाही, कारण शिखर परिषदेत सहभागी होणारे सर्व नेते अनेकवेळा परस्परांसोबत असतील, परंतु याहून अधिक काही घडण्याची अपेक्षा नसल्याचे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. बांगलादेश अंतरिम सरकारचा प्रत्येक सदस्य जवळपास दररोज भारताच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करत असल्याने औपचारिक भेटीसाठी स्थिती अनुकूल नसल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
बिम्सटेक शिखर परिषदेदरम्यान युनूस आणि मोदी यांच्यात द्विपक्षीय बैठक आयोजित करण्यासाठी भारताशी कूटनीतिक संपर्क साधला असल्याची माहिती बांगलादेशचे विदेश सल्लागार तौहीद हुसेन यांनी दिली होती. बिम्सटेक परिषद ही भारत आणि बांगलादेश यांचे संबंध बिघडलेले असताना होत आहे. बिम्सटेकमध्ये बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड हे देश सामील आहेत.
द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव
भारताने अलिकडेच बांगलादेशातील हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांसह बिघडत्या कायदा सुव्यवस्थेबद्दल तेथील अंतरिम सरकारसमोर चिंता व्यक्त केली आहे. तर युनूस सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात मिळालेल्या आश्रयाबद्दल चिंता बोलून दाखविली तसेच त्यांच्या प्रत्यार्पणाची विनंती केली आहे. याचबरोबर नद्यांचे जलवाटप आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर काटेरी कुंपण उभारण्याच्या मुद्द्यांवरून दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत.









