पंजाबमधील पक्षाची जबाबदारी सिसोदियांकडे : दिल्लीची धुरा सौरभ भारद्वाज सांभाळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्ष संघटनेत मोठा फेरबदल करण्यात आला आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पंजाबचे प्रभारी नियुक्त करण्यात आले आहे. तर सत्येंद्र जैन यांना पंजाबचा सह-प्रभारी करण्यात आले आहे. याचबरोबर सौरभ भारद्वाज यांना दिल्ली आप संयोजक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. म्हणजेच त्यांना दिल्लीत पक्षाची धुरा सोपविण्यात आली आहे. भारद्वाज यांनी गोपाल राय यांची जागा घेतली आहे. तसेच डोडाचे आमदार मेहराज मलिक यांना पक्षाच्या वतीने जम्मू-काश्मीर संयोजक नियुक्त करण्यात आले आहे. गुजरात, गोवा, पंजाब आणि छत्तीसगडमध्ये नवे प्रभारी आणि सह-प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत.
गुजरातमध्ये पक्षाचे प्रभारी म्हणून गोपाल राय काम पाहतील. तर दुर्गेश पाठक येथे सह-प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. गोव्यातील पक्षाचे प्रभारी म्हणून पंकज गुप्ता यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीला अंकुश नारंग, आभास चंदेला आणि दीपक सिंगला यांची सह-प्र्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
छत्तीसगडमधील पक्षाच्या प्रभारीपदी संदीप पाठक यांची वर्णी लागली आहे. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा आणि संजय सिंह हे पक्षाच्या राजकीय विषयक समितीच्या बैठकीसाठी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी शुक्रवारी पोहोचले होते.
पंजाबमध्ये आमच्या पक्षाचे सरकार आल्यापासून मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. आम आदमी पक्ष पंजाबच्या लोकांच्या कल्याणासाठी काम करणे जारी ठेवणार आहे. आम आदमी पक्षाचा प्रत्येक समर्पित कार्यकर्ता पक्षाचा हिस्सा असल्याबद्दल गर्वाची अनुभूती करेल हे आम्ही सुनिश्चित करणार आहोत असा दावा पंजाब पक्षाच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्यावर मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे.
आतिशींकडे दिल्लीची जबाबदारी
दिल्लीतील पक्षाच्या पराभवानंतर आतिशी या विरोधी पक्षनेत्या म्हणून भाजपच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारचा सामना करण्यासाठी राजकीय रणनीति तयार करतील. विधानसभा निवडणूक आणि दिल्ली सरकारवर होणाऱ्या राजकीय हल्ल्यांची रणनीति आतिशीच ठरवतील. तर मोठे निर्णय घेताना त्या सर्वोच्च नेतृत्वाची सहमती घेणार आहेत. तर पक्षाच्या दिल्ली शाखेचे संघटनात्मक कार्य, पक्षाचा विस्तार आणि फेरबदलाचे काम प्रदेश संयोजक गोपाल राय यांच्या अधीन असणार आहे.









