खलिस्तान समर्थकांना केला होता विरोध : लिबरल पार्टीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाच्या सत्तारुढ लिबरल पार्टीने आगामी संसदीय निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेत खासदार चंद्रा आर्य यांची उमेदवारी रद्द केली आहे. भारतीय वंशाचे हिंदू खासदार चंद्र आर्य नेपियन मतदारसंघाचे खासदार होते. खलिस्तान समर्थक घटकांच्या विरोधात प्रखर आवाज उठविणारे नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. तर लिबरल पार्टीच्या या निर्णयामुळे कॅनडाच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण झाला आहे.
पक्षाने माझी उमेदवारी रद्द केली आहे असे चंद्र आर्य यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे. तर लिबरल पार्टीकडुन जारी पत्रानुसार निवडणूक प्रचार मोहिमेच्या अध्यक्षाने चंद्र आर्य यांच्या पात्रतेची विस्तृत समीक्षा केली, यानंतरच त्यांची उमेदवारी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली जी पक्षाने स्वीकारली आहे. आर्य यांनी या निर्णयाला अत्यंत निराशाजनक ठरविले. परंतु यामुळे नेपियन मतदारसंघाच्या लोकांची सेवा करण्याचा माझा सन्मान आणि गर्व कमी होणार असल्याचे चंद्र आर्य यांनी म्हटले आहे.
नेपियनमध्ये आगामी निवडणुकीत उमेदवार म्हणून माझे नामांकन रद्द करण्यात आल्याचे लिबरल पार्टीकडून कळविण्यात आले आहे. हे वृत्त अत्यंत निराशाजक असलेत रीही यामुळे नेपियनच्या लोकांची आणि सर्व कॅनेडियन लोकांची 2015 पासून संसद सदस्य म्हणून सेवा करण्याचा गौरव आणि विशेषाधिकार कमी होणार नाही. मागील अनेक वर्षांपासून मी या भूमिकेसाठी स्वत:ला झोकून दिले होते. एक खासदार म्हणून केलेल्या कामावर मला गर्व आहे. नेपियनच्या रहिवाशांना मी अतूट सेवा प्रदान केली आहे. कॅनडाच्या लोकांसाठी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर मी तत्वाला धरून भूमिका मांडली आणि संकटसमयी ज्या कारणांमुळे मी उभा ठाकलो, त्या सर्वाबद्दल मला गर्व आहे. स्वत:चा समुदाय आणि देशाची सेवा करणे माझ्या जीवनाची सर्वात मोठी जबाबदारी राहिली आहे आणि मी याच्या प्रत्येक क्षणासाठी आभारी असल्याचे चंद्रा आर्य यांनी नमूद केले आहे.
लिबरल पार्टीने आर्य यांची उमेदवारी रद्द करण्यामागील कारण स्पष्ट केले नाही, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. चंद्रा आर्य यांची खलिस्तानविरोधी भूमिका आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांनी घेतलेली भेट यामुळे लिबरल पार्टीची कोंडी झाल्याचे मानले जात आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात आर्य यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी.ची भेट घेतली होती. या भेटीला कॅनडा सरकारने वैयक्तिक स्वरुपाची ठरविले होते. लिबरल पार्टीचा हा निर्णय कॅनडात खलिस्तानी गट आणि त्यांची वाढती राजकीय शक्ती दर्शविणारा असल्याचे मानले जात आहे. तर हा निर्णय पक्षाच्या अंतर्गत राजकारणाचा परिणाम असू शकतो असे काही जणांचे मानणे आहे.
खलिस्तानी समर्थकांचे टीकाकार
चंद्र आर्य हे कॅनडा आणि अन्य ठिकाणी सक्रीय खलिस्तानी घटकांच्या विरोधात ठोस भूमिका मांडत राहिले आहेत. कॅनडाला खलिस्तानी घटकांचे मुख्य केंद्र मानले जाते, परंतु चंद्र आर्य यांनी जाहीरपणे या विरोधात आवाज उठविला आहे. यामुळे ते खलिस्तानी गटांच्या निशाण्यावर राहिले आहेत. ऑक्टोबर 2023 मये अमेरिकेतील खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना भारतीय मुत्सद्यांवर कारवाई केल्यावर चंद्र आर्य यांना लक्ष्य करण्याचे आवाहन केले होते.
दहशतवादी पन्नूच्या कारवाया
गुरपतवंत सिंह पन्नूने एका पोस्टद्वारे कॅनडा सरकारकडे चंद्र आर्य यांच्या विरोधात चौकशी करण्याची मागणी केली होती. आर्य हे कथित खलिस्तान आंदोलनाच्या विरोधात गरळ ओकत असून भारत सरकारचे एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप त्याने केला होता. जुलै 2023 मध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय मुत्सद्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली असता आर्य यांनी खलिस्तान जनमत चाचणीला ‘कॅनडाच्या अंगणातील साप’ ठरविले होते. खलिस्तान समर्थकांकडून हिंदू मंदिरांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांची आर्य यांनी निंदा केली होती. तसेच कॅनडातील हिंदू समुदायाच्या सुरक्षेसाठी आवाज उठविला होता.









