मंडणगड :
रायगड जिल्ह्यातील वराठी येथे एकाचा खून करून त्याचा मृतदेह पोत्यात भरुन तालुक्यातील म्हाप्रळ मार्गान रायगडमधील पांगळोली गावाच्या हद्दीत टाकणाऱ्या तिघांना म्हसळा पोलिसांनी गजाआड केले आहे. यामधील दोघेजण गुहागरचे असल्याचे पुढे आले आहे.
मृताचे नाव उमेश पासवान उर्फ बादशहा असे असून, तो नालासोपारा येथील रहिवासी आहे. याबाबतचा दूरध्वनी १७ मार्च रोजी आल्यानंतर अवघ्या १२ तासात तपासाची सूत्रे हलवत आरोपींच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
याप्रकरणी संतोष साबळे, विशाल देवरुखकर (गुहागर), श्यामलाल मौर्य (रा. उत्तरप्रदेश या तिघांना म्हसळा पोलिसांनी अटक केली आहे.
म्हसळा तालुक्यातील पांगळोली-बंडवाडी येथे एका पोत्यात मानवी मृतदेह असल्याची शंका व्यक्त करणारा फोन म्हसळा पोलिसांना सोमवारी आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी त्या पोत्याची तपासणी केली असता, त्या पोत्यात पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे अवघड झाले होते. मात्र मृताच्या खिशात पोलिसांना एक डायरी आणि त्या डायरीत एक मोबाईल क्रमांक लिहिल्याचे आढळले. त्या क्रमांकावर संपर्क साधला असता, तो क्रमांक कोंढेपंचतन येथील मजूर ठेकेदार संतोष साबळे याचा असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार संतोष साबळे याला म्हसळा पोलीस ठाण्यात बोलावून त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी साबळे याच्या वराठी येथील साईटवर चौकशी केली असता, या साईटवरील दोन कामगारांनी हा खून केल्याचे स्पष्ट झाले. १३ रोजी राष्ट्रीय महामार्गाचे काम करीत असलेल्या कंपनीच्या वराठी येथील साईटवरील कामगारांमध्ये वाद झाला होता. त्यातूनच विशाल देवरुखकर व श्यामलाल मौर्य या दोन कामगारांनी रॉडने मारहाण करुन उमेश पासवान यास ठार मारले. या प्रकाराची माहिती साबळे याला दिल्यानंतर त्यानेच, हा मृतदेह गोणीत भरून रायगड जिल्हा हद्दीत टाकून देण्याचा सल्ला या कामगारांना दिला होता.








