जत :
जत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या मनमानी कारभार सुरु आहे. येथील अधिकारी व कर्मचारी नागरीकांची लूट करत असल्याच्या तक्रारी आणि एजंटकरवी कामे करून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भ्रष्ट कारभाराविरोधात लवकरच जत तहसील कार्यालयावर तालुक्यातील सर्व नागरिकांना बरोबर घेऊन बेधडक मोर्चा काढणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुनिल बागडे यांनी सांगितले आहे.
जत मतदारसंघाचे गोपीचंद खासदार विधानसभा आमदार पडळकर व विशाल पाटील यांनी जत तालुक्यातील कोणत्याही शासकीय कार्यालयात एक रूपया न देता सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची कामे झाली पाहिजेत, असे सांगितले होते. मात्र, येथील अधिकारी लोकप्रतिनिधींनाही जुमानत नाहीत. जतमधील पुरवठा शाखेतील अधिकारी सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करताना दिसत आहेत. त्यामुळे खासदार विशाल पाटील यांच्या मागणीला सुद्धा येथील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे.
जत तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत अधिकारी तालुक्यातील येणाऱ्या नागरिकांकडून रेशनकार्ड व पुरवठा विभाग संबधीत कामे मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी करत असल्याने सर्व सामान्य नागिकांना काम न करताच निराश हाताने परत जावे लागत आहे. पुरवठा शाखेतील अधिकारी हम करे सो कायदा याप्रमाणे वागत आहेत.
अधिकारी काही ठराविक दुकानदार, एजंट यांना हाताशी धरून त्यांच्यामार्फत आलेली कामे तात्काळ मार्गी लावत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे, या विरोधात आता आपण मोर्चा काढणार असल्याचे बागडे यांनी सांगितले.








