मिरज :
चारच दिवसापूर्वी मिरज शहरात एकाचवेळी दोन घरे फोडून चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच म्हैसाळ येथे शेडबाळ रस्त्यावर घरफोडीची घटना घडली. चोरट्यांनी बंद घराचे छत फोडून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत श्रीमती हर्षाली बबन माळी यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
म्हैसाळ शेडबाळ रस्त्यावर धुमाळकुडी वस्तीवर श्रीमती हर्षाली माळी या राहण्यास आहेत. सोमवारी सकाळनंतर त्या बाहेर गेल्या होत्या. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या छतावर चढून कवले काढून आत प्रवेश केला. कपाटातील २० हजारांची सोन्याची पाच ग्रॅम वजनाचे चेन, ४० हजार रुपयांचा सोन्याचा नेकलेस आणि आठ हजार रुपयांची रोख रक्कम असा ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
बुधवारी माळी या घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. पोलिस उपाधिक्षक प्रणिल गिल्डा यांच्यासह ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जावून पंचनामा केला. याबाबत अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, शहर आणि ग्रामीण भागात पुन्हा एकदा घरफोडीचे सत्र सुरू झाल्याचे दिसत आहे. चारच दिवसांपूर्वी शहरातील समतानगर आणि मिरज कृष्णाघाट रस्त्यावर एकाच रात्रीत दोन घरे फोडून चोरी झाली होती. आता म्हैसाळमध्येही घरफोडीची घटना घडली आहे. घरफोडी करणाऱ्या चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याची भीती व्यक्त होत आहे. पोलिसांनी रात्रीच्या सुमारास गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.








