कोल्हापूर :
दोघांनी एकमेकांवर प्रेम केले. पण नंतर मुलीने प्रेमाला नकार दिला आणि प्रेमवीर नैराश्यात गेला. नैराश्य इतके आले की गुरुवारी सकाळी त्यांने आत्महत्येसाठी थेट रंकाळा गाठला. रंकाळा तलावात उडी मारणार इतक्यात फिरायला आलेल्या नागरिकांनी त्याला काठावरुन बाजूला ओढले आणि त्याचा जीव वाचवला. गुरुवारी सकाळच्या वेळी रंकाळा परिसरातील या प्रेमवीराच्या कर्तबागारीची चांगलीच चर्चा रंगली होती.
क्षुल्लक कारणावरुन नैराश्य येऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण तरुण तरुणीमध्ये वाढले आहे. गळफास, कीटनाशक प्राशन करुन किंवा पाण्यात उडी मारुन जीव दिला जात आहे. परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने दहावी–बारावीची परीक्षा दिलेली मुले आत्महत्या करत आहेत. परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने बुधवारी एका मुलीने आपली जीवन संपवले. तर प्रेमभंग झाला म्हणून गुरुवारी सकाळी फुलेवाडी परिसरातील एका प्रेमवीराने रंकाळा तलावात आत्महत्येचा प्रयत्न केला.
नागरिकांनी त्याला विश्वासात घेत धीर देत बोलते केले. यावेळी त्यांने प्रेमभंगाची शोकांतिका व्यक्त केली. सुरुवातीला प्रेम केले. पण नंतर मुलीने नकार दिला म्हणून आपण जीवन संपवण्यास निघालो होतो अशी त्यांने कबुली दिली. यानंतर त्याच्याच मोबाईलवरुन त्याला वाचवणाऱ्या नागरिकांनी त्याच्या कुटुंबियांना कळवले. यामुळे त्याचे पालक धावतच रंकाळयावर पोहोचले. मुलाला सुखरुप पाहिल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला. यावेळी पालकांनी त्याला वाचवणाऱ्या नागरिकांचे आभार मानले.
- तरुणाचे समुपदेशन
प्रेमवीरास वाचवणाऱ्यांमध्ये काही सामाजिक कार्यकर्ते होते. त्या तरुणाला घेऊन त्याच्या पालकांच्या घरी गेले. याठिकाणी एका तास त्यांनी प्रेमवीराचे समुपदेशन केले. मुलगी आणि प्रेम म्हणजे सर्वस्व नसून त्यापलीकडे एक जग आहे. आईवडिलांचा विचार करुन स्वत:चे करिअर करण्याचा सल्ला दिला.








