राज्यसभा सदस्य कडाडी यांची माहिती
बेळगाव : धारवाडपर्यंत धावणारी ‘वंदे भारत’ रेल्वे बेळगावपर्यंत विस्तारीत करण्याच्या तारखेची लवकरच घोषणा करण्यात यावी, बेळगाव-मिरज मार्गावरील रेल्वे कायमची सुरू करणे, तसेच मुंबई-होसपेट आणि सोलापूर-होसपेट या रेल्वे बळ्ळारीपर्यंत विस्तार करण्याच्या मागणीला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली असल्याची माहिती राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी एका पत्रकाद्वारे कळविली आहे. राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी व खासदार जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कर्नाटकात धावणाऱ्या रेल्वेंच्या विस्तारासंबंधी माहिती दिली.
लोकापूर-रामदुर्ग-सौंदत्ती-धारवाड मार्गावर रेल्वे सुरू करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात यावे. सौंदत्तीत रेणुका देवीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. भाविकांच्या सोयीसाठी सौंदत्तीला रेल्वेची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तसेच बेळगावातील जनतेची अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या बेंगळूर- धारवाड मार्गावरील वंदे भारत रेल्वेचा विस्तार बेळगावपर्यंत करण्याची पूर्तता व्हावी. बेळगाव-मिरज मार्गावर दररोज धावणारी पॅसेंजर रेल्वे कायम करण्यात यावी. त्यामुळे बेळगावहून मिरज मार्गावरील गावांना जाणाऱ्या प्रवाशांना सोयीचे होईल, अशा मागण्या केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मांडण्यात आल्या. या मागण्यांना केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे राज्यसभा सदस्य कडाडी यांनी म्हटले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी झालेल्या चर्चेप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हेही उपस्थित होते.









