भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे कविता : अर्थपूर्ण कविताच आपल्या मनात कायम घर करून राहतात
मनीषा सुभेदार/बेळगाव
आज 21 मार्च ‘जागतिक कविता दिन’ आणि 20 मार्च रोजी झालेला ‘जागतिक चिमणी दिन’च्या निमित्ताने मराठी कवितांमधील चिमणीचे हे भावविश्व…एक घास चिऊचा, एक घास काऊचा असे म्हणत आई आपल्याला भरवते आणि बडबड गीत, कविता यांची ओळख तिथूनच सुरू होते. मुलांसाठीची बडबड गीते त्यांचे भावविश्व समृद्ध करतात. आणि त्यामध्ये प्रामुख्याने असते ती चिमणी. मराठी कवितांमध्ये किंबहुना सर्वच भाषांतील कवितांमध्ये चिमणी हे प्रतीक वारंवार आढळते. चिमणी एक पक्षी असला तरी चिमणी म्हणजे आपली लाडाची लेक असेही मानून तिच्यावर असंख्य कविता केल्या गेल्या आहेत. 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला आणि आज 21 मार्च हा जागतिक कविता दिन आहे.
या अनुषंगाने कित्येक मराठी कवितांमध्ये, गीतांमध्ये चिमणी हे प्रतीक अनेक अर्थांनी वापरले गेले आहे. ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज आणि शांता शेळके यांनीसुद्धा चिमणीला आपल्या कवितांमध्ये शब्दबद्ध केले आहे. कावळा, चिमणीची गोष्ट तर वर्षानुवर्षे आणि पिढ्यान्पिढ्या चालणारी तसेच ‘एक घास चिऊचा’ ही गोष्टसुद्धा. कविता दिनाच्या निमित्ताने आपण काही कवितांकडे नजर टाकली किंवा त्या वाचल्या तर अनेक उत्तमोत्तम उपमा कवितांमध्ये आपल्याला आढळतात. कविता हा भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार आहे. त्यामुळे ठरवून कविता करणे हे अशक्यच. अलीकडे ट ला ट, र ला र जोडवून कविता होत आहेत पण त्या जितक्या वेगाने उगवतात तितक्याच वेगाने विस्मरणातही जातात. मात्र, अर्थपूर्ण कविता आपल्या मनात कायम राहतात.
यापैकी कवी भा. रा. तांबे यांची
‘चिव चिव चिमणी छतात,
आरसा लोंबे भिंतीला
चिमणी पाहे सवतीला’
ही कविता पहा, स्त्रियांच्या मनातील सवतीविषयीची भावना कवी किती वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो. आणि त्याचवेळी आपलेच प्रतिबिंब पाहून चिमणीच्या मनात कोणते विचार येतात हे भाव टिपतो. तर कुसुमाग्रज आपल्या चिमणी कवितेत म्हणतात,
‘फांदीवर चिमणी, भुरकी पांढरी
चिव चिव करते, माझ्याकडे पाहते,
नभाकडे बघते’
तर बालकवी ‘चिमणीचा घरटा’ या कवितेत कावळा, कपिला, कोंबडी अशा सर्वांना आपला घरटा कोणी नेला? असे विचारत राहते. पण तिला उत्तरच मिळत नाही. तेव्हा ती ‘राहीन मी घरट्याविना, चिमणी उडून गेली रानात’ असे म्हणत आपल्या स्वातंत्र्याचे गीत गाते.
‘एक चिमणी पिल्लासह,
रोज माझ्या घरात येते
देवापुढे उभे राहून, दु:ख आपले सांगते
इवलासा रे जीव माझा, तळ नाही, झाड नाही
असा कसा रे भाव तुझा’
असे म्हणत आज इवल्याशा जीवांची किंमत कवडीमोल झाली का? असा प्रश्नही रमेश तांबे आपल्या कवितेतून विचारतात. काही कवितांमध्ये चिमणा-चिमणीचं लगीन असून तिथे वऱ्हाडी कोण कोण? असा प्रश्न केला जातो. तर चिमण्यांवरील बडबड गीतांमध्ये फौंटन म्युझिकने
‘चिव चिव चिमणे,
हा बघ आणला मोत्याचा दाणा,
पण ठेवायचा कुठे? त्यात काय मोठे,
चला घर बांधू झाडावर
हे गीत मोठे मनोरंजक केले आहे. मात्र, आता झाडेच कमी होत सिमेंटचे जंगल उभे राहिले तर घरटे कुठे बांधायचे? हा प्रश्न केवळ चिमणीलाच नाही पुढील काळात मानवजातीलाही पडणार आहे.
‘अगं अगं चिमणे हे घे दाणे
दाणे आहेत चिमूटभर सांडू नको वाटेवर
पोळ्या कर आठ-नऊ, भात कर मऊ-मऊ
पेबल्स मराठीच्या या बडबड गीतातून कित्येक शब्दांची ओळख आपल्या चिमण्या पिल्लांना करून देण्यात आली आहे. बहुसंख्य कवितांमध्ये चिमणी म्हणजे आपली लेक असे मानले गेले आहे. आकाशभाऊ शिंदे यांची
‘रत्नासारखी जतन केली आणि
चिमणी उडून गेली’
अशी कविता नेमका हाच अर्थ प्रकट करते. एका अर्थाने मराठी कवितांचे भावविश्व चिमणीने समृद्ध केले आहे. फक्त आपण त्यांचे वाचन आणि गायन करून मुलांपर्यंत ते पोचवायला हवे. पंखात बळ आले की पिल्ले उडून जाणारच. त्यांना त्यांच्या चोचीमध्ये दाणा भरून घास घालून आपणच त्यांच्या पंखात ‘बळ’ निर्माण केलेले असते. त्यामुळे त्यांनी उडू नये असे मानणे संयुक्तिक ठरणार नाही. परंतु ज्यांनी ‘बळ’ दिले त्यांच्या संध्यासमयी त्यांचे ‘बळ’ होऊन उभे राहणे हे पिल्लांचेही कर्तव्यच आहे. म्हणूनच तर ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजामुळे अजरामर झालेल्या
‘या चिमण्यांनो परत फिरा रे
घराकडे आपुल्या, जाहल्या तिन्ही सांजा
दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर
अशा अवेळी असू नका रे आईपासून दूर’
या गीताच्या ओळी पुन: पुन्हा आठवत राहतात.









