पशुसंगोपन खात्याकडून आवाहन : पौष्टिक आहारासह मुबलक पाणी द्या
बेळगाव : उष्णतेचा मानवावर परिणाम होतो, त्याचप्रमाणे पशु-पक्ष्यांवरदेखील होतो. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत शरीराचे तापमान जनावरे नियंत्रित करू शकतात. त्यानंतर जनावरांना उष्माघात होतो. सध्या उष्णतेत प्रचंड वाढ झाली असल्याने जनावरांचीदेखील काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंगोपन खात्याकडून करण्यात आले आहे. उष्माघातामुळे जनावरांचे डोळे खोल जातात. नाकपुडी कोरडी पडते. नाडी आणि श्वासाची गती वाढते. ही लक्षणे दिसताच तातडीने पशुवैद्यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
वाढत्या उन्हामुळे उष्माघात होऊन जनावरांच्या नाकातून रक्तस्राव, अपचन, विषबाधा दिसून येते. जनावर चारा खाणे व पाणी पिणे सोडून देतात. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. रवंथ करणेदेखील कमी होते. परिणामी दूध उत्पादनात घट होते. अशी जनावरे गाभण राहत नाहीत. तसेच त्यांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम दिसून येतो. उष्माघात हा गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कुत्रा, कोंबडी तसेच सर्व पाळीव प्राण्यांना होऊ शकतो. म्हशींमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. कारण त्यांच्या त्वचेवरून सूर्यकिरणे परावर्तित होत नाहीत, शोषली जातात. त्याचबरोबर उष्माघात संकरित गायींमध्येदेखील मोठ्या प्रमाणात दिसून येतो. वाढत्या उष्णतेमुळे जनावरांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, असे तज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
उष्माघात होण्याची कारणे
वातावरणातील तापमानात वाढ, शरीराचे तापमान नियंत्रित न करता येणे, शरीरातील उष्णता बाहेर न पडणे, इतर संसर्गजन्य आजार.
उष्माघाताची लक्षणे
चारापाणी कमी खाणे, डोळे खोल जाण्यासह नाकपुडी कोरडी पडणे, नाडीची आणि हृदयाची स्पंदनगती वाढणे, श्वसनाची गती वाढणे; उघड्या तोंडाने श्वास घेणे, बैल कामाला जुंपल्यानंतर लवकर थकणे, आतड्यांची हालचाल कमी होणे, पचनक्रिया घट्ट होणे; शेण घट्ट होणे, लघवी गडद पिवळ्या रंगाची दिसणे, त्वचा कोरडी निस्तेज पडणे, दूध उत्पादनात घट.
उपाययोजना
- उन्हाच्या वेळेस सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जनावरांना झाडांच्या सावलीत बांधणे.
- चारा खाण्याच्या वेळेत बदल करून सकाळी 7 ते 9 पर्यंत आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत चरावयास सोडणे.
- जनावरांना ऊर्जायुक्त खाद्य द्यावे;खाद्यात जीवनसत्व अ, ड, ई, क तसेच शक्य असल्यास 24 तास थंड पाणी द्यावे.
- दिवसातून चार वेळा पाणी पाजावे.
- खाद्यात हिरवा चारा असावा.
- गोठ्याचा मुख्य भाग उत्तर-दक्षिण असावा, त्यामुळे सूर्यप्रकाश थेट येणार नाही.
- गोठ्यातील हवा खेळती असावी,गोठ्याभोवती सावली देणारी झाडे लावावीत.
- गोठ्यात तापमान, आर्द्रता निर्देशांक दर्शविणारे थर्मामीटर असावे.
- शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी गोठ्यात पंखे लावण्यासह जनावरांच्या अंगावर शक्य असल्यास थंड पाण्याचे सुती कपडे किंवा पोते ठेवावे.
पशुपालकांना टिप्स
मनुष्याप्रमाणेच पशु-पक्ष्यांवरदेखील वाढत्या उष्णतेचा परिणाम होतो. जनावरांनाही उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे आधीच खबरदारी घेणे जरुरीचे आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार पशुपालकांना काही महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या आहेत. त्यांचे उन्हाळ्यात पालन करावे, जेणेकरून जनावरांना उष्माघात होणार नाही. उष्माघाताची लक्षणे दिसून आल्यास तातडीने तज्ञ पशुवैद्यांचा सल्ला घ्यावा.
– डॉ. राजीव कुलेर, उपसंचालक पशुसंगोपन खाते









